ग्रंथांची मैत्री आयुष्य समृद्ध करते:वि.दा. पिंगळे
ध्यास फाउंडेशन आळंदीतर्फे व्याख्यान
पुणे
ग्रंथांची मैत्री आयुष्य समृद्ध करते असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते वि.दा. पिंगळे यांनी केले ध्यास फाउंडेशन आळंदी पुणे या संस्थेच्या 24 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने वाचनातून समृद्धीकडे या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते.तेव्हा ते बोलत होते
वि.दा. पिंगळे यांनीयावेळी विस्तृतपणे ग्रंथांचे मोल मानवी समाजाला किती आहे हे सांगितले ते म्हणाले, सामाजिक जीवनमूल्ये जी काही आज शिल्लक आहेत ते निव्वळ ग्रंथांमुळेच. माणसाचे माणूसपण टिकून ठेवण्यात ग्रंथांचे योगदान मोठे आहे. विद्यार्थ्यांनी ह्या तुमच्या संस्कारक्षम वयात ग्रंथांशी मैत्री करावी. ग्रंथ हे प्रामाणिक मित्र असतात , ते कधीही चुकीच्या मार्गावर नेत नाहीत .तर आपले आचार आणि विचार समृद्ध करतात .ग्रंथाच्या सोबतीने आपण एका जीवनात अनेक जीवन जगण्याची अनुभूती घेऊ शकतो.
जोपर्यंत पालकांच्या हातात पुस्तके दिसणार नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार नाही. पालकांनी दर महिन्याला आपल्या किराणा मालाच्या यादीत दोन पुस्तकांची सुद्धा नावे लिहावीत ,तरच आपले कुटुंब खऱ्या अर्थाने समृद्ध होईल . आपल्या घरातून वैचारिक सक्षम पिढी तयार होईल..या त्यांच्या व्याख्यानात ग्रंथाच्या सोबतीने घडलेल्या अनेक महापुरुषांची त्यांनी उदाहरणे दिली. अण्णा हजारे, स्वामी विवेकानंद, यशवंतराव चव्हाण , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याला ग्रंथांनी कशी कलाटणी दिली हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. ग्रंथाच्या सोबतीने आयुष्य कसे बदलू शकते, मनातले नैराश्य कमी होऊन नवीन जगण्याचे बळ प्राप्त होते. लेखन कला मानवाला प्राप्त झाली त्यामुळे संपूर्ण जग एवढी प्रगती करू शकले .महाराष्ट्राला थोर संतांची आणि लेखकांची मोठी समृद्ध परंपरा आहे. आळंदी हे तर महाराष्ट्राची एक पावनभूमी आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा नाम उच्चार केला तरी मनाला प्रसन्नता लाभते. ज्ञानेश्वरी व पसायदान आज महाराष्ट्रातल्या घराघरात वाचली जावी ही इच्छा व्यक्त केली.महाराष्ट्राला दिशा आणि सद् विचार देण्याचे काम ज्ञानेश्वर माऊलीं,संत तुकाराम महाराज व इतर सर्वच संतांनी केले आहे .ही परंपरा पुढे सुरू राहावी,ही जबाबदारी नव्या पिढीची आहे असे त्यांनी नमूद केले.रिटायर्ड आयपीएस अधिकारी डॉ.माधवराव सानप यांनी 24 वर्षांपूर्वी गुन्हेगार व फासेपारधींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ध्यास फौंडेशन या संस्थेची स्थापना करून मराठी माध्यमाची शाळा आळंदी, पुणे या ठिकाणी सुरू केली. आजपर्यंत असंख्य विद्यार्थी या संस्थेने घडविली. त्यांना नवे भविष्य दिले. गुन्हेगार किंवा फासेपारधींची मुले सामाजिक विकासापासून दूर राहू नयेत. शिक्षण घेतले तर त्यांचे भविष्य उज्वल होऊ शकते या उदात्त भूमिकेतून त्यांनी संस्थेची स्थापना केली.
याप्रसंगी त्या शाळेतील विविध स्पर्धा परीक्षा व वार्षिक परीक्षांमध्ये विशेष गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त मा. चंद्रकांत लिंगायत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला .याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधवराव सानप, विश्वस्त मा. मुकुंद कुलकर्णी, मा. गणेश गरुड, मुख्याध्यापिका मा.अक्षता कुलकर्णी व जवळपास 200 पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . मनिषा दरेकर यांनी केले. सुयश मंगल कार्यालय आळंदी, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

