‘एकच लक्ष विधानसभा क्षेत्र’


राज्यभरात संघटना वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मोहीम
मुंबई
आम्ही राज्यात स्पष्टपणाचे धोरण घेऊन ‘एकच लक्ष, विधानसभा क्षेत्र’ हे सुत्र घेऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ४ जूनच्या निकालाची फारशी वाट न बघता राज्यभरात पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी आणि संघटना अधिक गतीमान करण्यासाठी विधानसभा क्षेत्रानुसार जिल्हानिहाय आढावा घेऊन पावले उचलली जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२७ मे रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक गरवारे क्लब हाऊसमध्ये होणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय नेते अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मंत्री, आमदार, पक्षाचे लोकसभा उमेदवार, सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
२७ मे रोजी आमची आढावा बैठक जरी असली तरी आम्ही संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम देणार आहोत. १० जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन असून त्यानुसार मुंबई, दिल्ली याठिकाणी कार्यक्रम करण्याची तयारी व नियोजन होणार्‍या बैठकीत कोअर कमिटीच्या ग्रुपमध्ये चर्चा केली जाणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
या बैठकीला महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या, राजकारणाला कलाटणी देणारा हा प्रवेश होणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करुन महायुतीच्या समन्वय समितीची बैठक लवकर बोलावण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूकीचा आढावा आणि पुढचे नियोजन यासंदर्भात पावले उचलावीत यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिक सक्रियदृष्ट्या दक्ष राहून अधिक ग्रामस्तर ते राज्यपातळीवर काम करण्याचे नियोजन करत आहे. परवा होणार्‍या पक्ष प्रवेशानंतर देशभरात आणि राज्यभरात ताकद अधिक वाढली जाईल असा विश्वास व्यक्त करतानाच त्याचा फार मोठा परिणाम आगामी निवडणुकीत होऊ शकतो असा दावा सुनिल तटकरे यांनी केला.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!