जितेंद्र आव्हाडांच्या कारवर हल्ला


छत्रपती संभाजीराजेंवर केलेल्या विधानावरून वाद

Advertisement

ठाणे
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारवर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेचे हे कार्यकर्ते असल्याचं बोललं जातं.संभाजीराजेंना आता छत्रपती म्हणण्याचा अधिकार नाही असं विधान आव्हाडांनी केले होते. त्यामुळे स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाडांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आज हा हल्ला झालेला आहे.
मुंबईत आज जितेंद्र आव्हाडांची पत्रकार परिषद होती. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर आव्हाड त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी निघाले होते. त्यावेळी वाटेत वाहतूक कोंडीत आव्हाडांची कार अडकली असता त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची कार वेगाने पुढे नेण्यात आली. या हल्ल्याची जबाबादारी स्वराज्य संघटनेने घेतली आहे.संभाजीराजे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केली. तू मर्द असता तर पळाला नसता, तू पळपुटा आहेस हे महाराष्ट्राला कळालं आहे असं विधान स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. विशेष म्हणजे पोलिसांचं वाहन जितेंद्र आव्हाडांच्या कारमागे होते. त्यावेळी शेजारून आलेल्या वाहनातून हे कार्यकर्ते उतरले आणि त्यांनी हातातील बांबूच्या सहाय्याने आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत घोषणा दिल्या. विशालगडावर संभाजीराजे यांनी जे आंदोलन केले होते त्यावर जितेंद्र आव्हाडांनी नापसंती व्यक्त केली होती.
महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही इतका कायदा सुव्यवस्था बिघडला नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानाही हे सगळं होतंय. राज्यात कायद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!