डॉ. गिरीश कुलकर्णी यांना चाफेकर पुरस्कार


शुक्रवार दिनांक २६ डिसेंबरला होणार वितरण
सातारा
ज्ञानविकास मंडळाचे वतीने दिल्या जाणाऱ्या कै. वि. ल. चाफेकर सामाजिक सेवा पुरस्कारासाठी अहिल्या नगरचे रहिवासी आणि स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे
ज्ञानविकास मंडळाचे वतीने गेल्या वर्षीपासून ज्ञानविकास मंडळाचे संस्थापक कै. वि. ल. चाफेकर यांच्या नावाने राज्यस्तरीय वि ल. चाफेकर सामाजिक सेवा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला. या पुरस्काराचे यंदा द्वितीय वर्ष आहे. ११,००० रू. रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्या असाधारण अशा व्यक्तीने कोणत्याही एखाद्या सामाजिक,शैक्षणिक,साहित्य, सांस्कृतिक अथवा कला क्षेत्रात अनेक वर्ष एकनिष्ठेने,सातत्याने भरीव कामगिरी करून त्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे अशा कार्यकर्त्याला हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे. या वर्षी स्नेहालय संस्थेचे संस्थापक आणि अहिल्या नगरचे रहिवासी डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांची या वि. ल. चाफेकर सामाजिक सेवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. न्यू इंग्लिश स्कूल सातारा चे माजी शिक्षक श्री.गोविंद बेडकीहाळ, नगर वाचनालयाच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्री. अनंत जोशी, ज्येष्ठ पत्रकार श्री. संजय कोल्हटकर आणि जेष्ठ कवयित्री सौ. प्रमिला कुलकर्णी या चार सदस्यीय निवड समितीने आणि समन्वयक श्री. रविंद्र शिवदे यांनी एकमताने डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांची कै. वि. ल. चाफेकर सामाजिक सेवा पुरस्कारासाठी निवड केली आहे. स्नेहालय ही संस्था वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या महिलांच्या तसेच त्यांच्या बालकांच्या पुनर्वसनाचे काम करणारी देशातील एक अग्रगण्य संस्था आहे. Home of Love हे या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. स्नेहालय ही संस्था गेली ३५ वर्षे वंचित, अनाथांना सुरक्षित आश्रय, आरोग्य सेवा,कायदेशीर मदत, व्यावसायिक रोजगार, कौशल्य प्रशिक्षण अशा सुविधा निःशुल्क पुरवते.

Advertisement

हा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता साताऱ्यातील राजवाड्याजवळील समर्थ सदन येथे साजरा होईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने प्राध्यापक उल्हास बापट यांचे “संसदीय लोकशाही समोरील आव्हाने” या विषयावर व्याख्यान होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!