वसंत व्याख्यानमालेत दिलखुलास हसवणारी हास्य संजीवनी


सातारा
ज्ञानविकास मंडळ सातारा यांचे वतीने सातारा शहरात चालू असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या 51 व्या वर्षात चौथे पुष्प सह्याद्री वाहिनीवरील वृत्त निवेदिका सौ दिपाली केळकर यांनी गुंफले. त्यांच्या कार्यक्रमाचा विषय होता दिलखुलास हसवणारी हास्य संजीवनी. याप्रसंगी त्यांनी सुरुवातीला विनोदातून हास्य निर्माण होते असे सांगितले.
त्या म्हणाल्या हास्याचे विविध प्रकार आहेत. गालातल्या गालात हसणे, स्मितहास्य, खुदकन हसणे, गडगडाटी हास्य, विकट हास्य, छद्मी हास्य. फोटोग्राफर फोटो काढताना सुद्धा प्रथम शब्द उच्चारतो ते म्हणजे स्माईल प्लीज. एवढे माणसाच्या जीवनामध्ये हसण्याला अर्थातच विनोदाला महत्त्व आहे. विनोदाचे देखील विविध प्रकार आहेत. आचार्य प्र.के.अत्रे, पु. ल. देशपांडे, चि. वि. जोशी, द. मा. मिराजदार, शंकर पाटील यांनी आपले साहित्य हे विनोदाने सजवले. आचार्य अत्रे, पु ल. देशपांडे यांचे कित्येक विनोद आजही जनमानसात प्रसिद्ध आहेत.

Advertisement


याप्रसंगी दिपाली केळकर यांनी विनोदाचे काही किस्से देखील सांगितले. पुणेरी पाट्याविषयी देखील त्या बोलल्या. लेखक सोपानदेव चौधरींना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता. त्या सुमाराला रुद्रवाणीचे संपादक जीवन किर्लोस्कर त्यांना भेटायला गेले तेव्हा आजारी असलेले सोपानदेव त्यांना म्हणाले मृत्यूच्या भेटीला साक्षात जीवन आला. जीवन किर्लोस्कर यांनी त्यांच्या ब्लड प्रेशरची चौकशी केली ते म्हणाले की ब्लड आहे परंतु प्रेशर नाहीये. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर एकदा काव्य महोत्सवाला गेले होते ते भाषणाला उभे राहिले. लगेचच त्यांना एक मोबाईलची रिंगटोन ऐकू आली. ते म्हणाले की पूर्वी लोक बाईलवेडे होते परंतु आता ते मोबाईल वेडे झाले आहेत. भारताचे माजी अर्थमंत्री सी.डी देशमुख यांचे एका ठिकाणी व्याख्यान होते. व्याख्यानानंतर त्यांना एकाने प्रश्न विचारला की तुमचे नाव चिंतामण की चिंतामणी ते म्हणाले माझे खरे नाव चिंतामणी. परंतु माझ्या नावापुढे राव लावण्यासाठी चिंतामण केले गेले. पण माझ्या जीवनात जरा सुद्धा चिंता नाही.
दिपाली केळकर म्हणाल्या हास्य जितकं महत्त्वाचे तितकेच कुठे हसू नये हे कळणं सुद्धा तितकच महत्त्वाचं आहे. हसण्यामुळे आपले आयुष्य निखळ आणि निर्मळ होते. एकदा एका विदूषकाने एक विनोद सांगितला लोकांनी दिलखुलास हसून त्याला उत्स्फूर्त दाद दिली. त्या विदूषकाने तो विनोद पुन्हा सांगितला दुसऱ्या वेळी मात्र लोक थोडेच हसले पहिल्या इतकी दाद त्यांनी दिली नाही. त्या विदूषकाने पुन्हा तिसऱ्यांदा तोच विनोद सांगितला यावेळी मात्र लोक अजिबात हसले नाहीत. त्यावर तो विदूषक लोकांना म्हणाला तीन बार आप जोक सुननेसे हस्ते नही हो तो एक गम को लेकर बार-बार रोते क्यू हो ?
केळकर यांनी अध्यात्म आणि विनोद यांचा देखील परस्पर संबंध असल्याचे सांगितले. दळणाचे जाते जसे सतत दळण दळत असते. ते सतत सुरू असते त्याचप्रमाणे माणसाचे जीवन देखील कायम सुरू राहिलं पाहिजे. दिपाली केळकर यांनी कार्यक्रमाची सांगता गीतकार उमाकांत काणेकर यांच्या प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा. हसा मुलांनो हसा या गीताने केली. या कार्यक्रमाला सातारकर रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. ज्ञानविकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रसाद चाफेकर यांच्या हस्ते दिपाली केळकर यांचा सत्कार करण्यात आला. श्याम चितळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली अरुण राजहंस यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!