सावधान, तुमचा मोबाईल नंबर बंद होऊ शकतो


केंद्राच्या एका निर्णयामुळं 6 लाखांहून अधिक युजर संकटात
नवाबी दिल्ली
सध्या भारतात दर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. पण, आता मात्र देशातील बहुतांश मोबाईल युजर्स धोक्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाकडून देण्यात आलेल्या निर्देशांनंतर हि कारवाई केली जात आहे
देशातील दूरसंचार विभागाकडून सहा लाखांहून अधिक मोबाईल कनेक्शनचं रि वेरिफिकेशन करण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीनं टेलिकॉम विभागानं जवळपास 6 लाख 80 हजार मोबाईल कनेक्शन चुकीच्या पद्धतीनं वापरात असल्याची शक्यता वर्तवली आहे. चुकीची माहिती किंवा कागदपत्र सादर करून हे दूरध्वनी क्रमांक सुरु असल्याची शक्यता या माहितीच्या आधारे वर्तवण्यात आली आहे.
दूरसंचार विभागाच्या या कारवाईअंतर्गत या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना 60 दिवसांआधी सदर दूरध्वनी क्रमांकांसंदर्भात पुन:पडताळणी अर्थात रि वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश दिले आहेत. दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, साधारण 6.80 लाख मोबाईल कनेक्शन अवैधरित्या दाखवण्यात आलेली कागदपत्र आणि ओळखपत्रांच्या आधारे सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. येत्या काळात जर कंपन्यांकडून मोबाईल क्रमांकांसंदर्भातील रिवेरिफिकेशनची प्रक्रिया तातडीनं करण्यात आली नाही, तर ते क्रमांक बंद केले जातील.
दूरसंचार विभागाकडून करण्यात आलेली ही कारवाई पहिल्यांदाच झाली नसून त्याआधी जवळपास 10,834 मोबाईल क्रमांकांसंदर्भात संशय व्यक्त करण्यात आला होता. ज्यानंतर 8272 क्रमांक बंदही करण्यात आले होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!