विधानसभेला कमी जागा घेणार नाही
शरद पवारांचा काँग्रेस, उद्धव ठाकरेंना थेट इशारा
मुंबई
लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असूनही आम्ही कमी जागा घेतल्या, पण विधानसभेला आम्ही कमी जागा घेणार नाहीत. जागा वाटपावरून मविआत फूट पडू शकते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे याना दिला आहे .
जागा वाटपावरून महायुतीमध्येही बिनसू शकते, असेही ते म्हणाले लोकसभेला उद्धवसेनेने २१, काँग्रेसने १७, शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या. या संदर्भात एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत विधानसभेला मविआने एकत्रच लढावं, अशी माझी इच्छा आहे. प्रामाणिक प्रयत्नही तसाच राहील. विधानसभेला २८८ जागा आहेत. त्यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल. लोकसभेला ४८ च जागा होत्या. माझा पक्ष आज लहान असला तरी जनमाणसांत रुजलेला आहे. तरीही आम्ही कमी जागा घेतल्या. जादा जागा घेऊन जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती. पण तिघांनी एकत्र राहण्याचे सूत्र आम्ही सर्वांनी पाळले.
केंद्रात सत्तास्थापनेसाठी भाजपला जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती करणार नाही. उद्धव ठाकरेही भाजपसोबत जाणार नाहीत म्हणजे नाहीत. बारामती लोकसभेला पैशाचा वापर झाला, असं लोक सांगतात, पण त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येणार नाही, असे पवार म्हणाले
