ब्रिटनमध्ये 4 जुलैला निवडणुका
पंतप्रधान ऋषी सुनक यांची मुदतपूर्व घोषणा
लंडन
ब्रिटनमध्ये येत्या 4 जुलै रोजी निवडणुका होतील, अशी घोषणा पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केलीय. ’10 डाऊनिंग स्ट्रीट’ या सरकारी निवासस्थानाबाहेर भर पावसात माध्यमांसमोर ऋषी सुनक यांनी आगामी निवडणुकांची घोषणा केली.”गेल्या पाच वर्षात दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वाधिक आव्हानं आमच्यासमोर होती, असं म्हणत ऋषी सुनक म्हणाले की, “येत्या काही दिवसात तुमच्यासमोर मतांसाठी संघर्ष करेन. आमच्याकडे एक स्पष्ट प्लॅन आहे.”
“आमच्या सरकारनं आतापर्यंत जे काही केलं, त्याचा मला अभिमान आहे,” असंही निवडणुकांच्या घोषणेवेळी ऋषी सुनक म्हणाले.पंतप्रधान ऋषी सुनक यांनी राजे चार्ल्स यांना 30 मे 2024 रोजी संसद बरखास्त करण्याची विनंती केली. ही विनंती राजे चार्ल्स यांनी मान्य केली.त्यामुळे पुढच्या आठवड्यातच संसद बरखास्त करून, निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल आणि 4 जुलै रोजी प्रत्यक्ष निवडणुका होतील.ब्रिटनमध्ये साधारणत: नव्या संसदेच्या पहिल्या बैठकीच्या पाचव्या वर्षपूर्तीनंतरच संसद बरखास्त केली जाते. विद्यमान संसदेच्या पहिल्या बैठकीची वर्षपूर्ती 17 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच संसद बरखास्त करून, निवडणुकांची घोषणा झालीय.नियमानुसार, संसद बरखास्त झाल्यानंतरचे 25 चालू दिवस आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी दिले जातात.
नियोजित प्रक्रियेचं पालन झालं असतं, तर ब्रिटनमध्ये 28 जानेवारी 2025 पूर्वीपर्यंत निवडणुका होणं अपेक्षित होतं. मात्र, आताच संसद बरखास्त केल्यानं त्यानुसार निवडणुका होतील आणि तशी घोषणा पंतप्रधान सुनक यांनी केली आहे
