शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली शपथ


कोरेगाव
सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत. विविध स्पर्धा त्याबरोबरच नाविन्यपूर्ण उपक्रमांचा त्यात समावेश आहे .नुकतेच देऊर मध्ये सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्ताने सर्व मान्यवर तसेच शेकडो विद्यार्थ्यांनी मुधाईदेवी विद्यामंदिरात मतदानाची शपथ घेतली आणि देशप्रेमाची प्रचिती दिली!प्राचार्य उत्तमराव महामुलकर यांच्या सेवानिवृत्ती समारंभानिमित्त ही मतदान शपथ सर्वांनी घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे सहाय्यक सचिव सुदर्शन कुंभार, कोरेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे तसेच विद्या कदम, लक्ष्मण बोराटे, सुयोग शहा, विनोद कदम, सचिन नलवडे,भीमराव कदम, राजेंद्र कदम ,देवेंद्र कदम ,सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि शेकडो विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.” मी मतदान करणार आणि इतरांनाही उद्युक्त करणार” या ध्येयाने मतदान जनजागृती करण्यात येत आहे. विद्यार्थी, महिला, दिव्यांग माजी सैनिक अशा सर्व घटकांना या जनजागृतीमध्ये शक्य तेवढे सामावून घेण्यात येत आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, कृषी कर्मचारी, महसूलचे कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती ग्रामपंचायत कर्मचारी अशा सर्व सरकारी विभागांचे कर्मचारी, अधिकारी शक्य तेवढी मतदान जनजागृती करीत आहेत. या सेवानिवृत्ती वेळी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदानाची जागृती करण्याचा निर्धार केला .यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी मतदानाचे महत्त्व विशद केले. शंभर टक्के मतदान अत्यंत आवश्यक आहे .देशाची समृद्धी, विकास आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि हा सहभाग घेऊन भवितव्य घडवण्याची संधी म्हणजे निवडणूक होय. मतदान कोणाला करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु मतदान न करणे खूप चुकीचे असून प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य आणि अधिकार या दोन्ही नात्यांनी मतदान केलेच पाहिजे ,असे प्रतिपादन श्री. चोपडे यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना यावेळी मतदान आणि लोकशाही याविषयी माहिती देण्यात आली .विद्यार्थ्यांनी देखील उत्सुकतेने ही सर्व माहिती जाणून घेतली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!