लेखक-वाचक संवादातून वाचनसंस्कृतीला बळ:रामदास नेहूलकर 


पुणे बुक फेअरमधील ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे
लेखक आणि वाचक यांच्यात प्रत्यक्ष संवाद घडवून आणणारा ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम पुणे बुक फेअरमध्ये उत्साहात पार पडला. लेखकांचा लेखनप्रवास, प्रेरणा, अनुभव आणि सामाजिक जाणिवा जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमातून वाचकांना मिळाली. साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम विशेष ठरला.कार्यक्रमाला दैनिक केसरीचे मुख्य उपसंपादक रामदास नेहूलकर आणि दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक आशिष तागडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. साहित्य आणि प्रसारमाध्यमे यांचा संबंध, वाचनसंस्कृतीचा विस्तार आणि लेखक-वाचक संवादाचे महत्त्व यावर या वेळी चर्चा झाली.लेखक-वाचक संवादातून वाचनसंस्कृतीला बळ मिळते असे मत रामदास नेहूलकर यांनी व्यक्त केले.
अॅडव्होकेट सीमंतिनी नुलकर, सविता नायक-मोहिते, डॉ. प्रेरणा उबाळे, श्रीराम नानल, प्रसाद नातू, नीलिमा गुंडी, सुवर्णा जाधव, श्री पठाण सर आणि डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी सहभाग घेतला. प्रत्येक लेखकाने आपल्या अनुभवविश्वानुसार लेखनाची सुरुवात, विषयांची निवड, आलेल्या अडचणी आणि सामाजिक निरीक्षणे मांडली.
लेखकाला प्रत्यक्ष भेटल्याने पुस्तकातील विचारांचा संदर्भ अधिक स्पष्ट होतो. लेखकाने एखादा विषय का निवडला, त्यामागील अनुभव कोणता आणि लेखनप्रक्रिया कशी घडते, याची माहिती वाचकांना मिळते. त्याचबरोबर वाचकांच्या प्रश्नांमुळे लेखकांनाही नवे विषय, वेगळे दृष्टिकोन आणि आत्मपरीक्षणाची संधी मिळते. त्यामुळे लेखन अधिक व्यापक आणि समाजाभिमुख होण्यास मदत होते, असा सूर चर्चेत उमटला.
आजच्या डिजिटल युगात माहितीची साधने वाढली असली तरी पुस्तकाचे सखोल वाचन, चिंतन आणि त्यातून विकसित होणारी विचारशक्ती यांचे महत्त्व कायम आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धीबरोबरच संवेदनशीलता आणि चिकित्सक दृष्टी विकसित होते. त्यामुळे वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याबरोबरच लेखकांशी संवाद आणि साहित्यचर्चेसाठी व्यासपीठे निर्माण करणे आवश्यक आहे.
मुख्य अतिथी रामदास नेहुलकर यांनी आपल्या मनोगतात आपल्या बालपणीच्या वाचन सवयी बद्दल माहिती दिली. तसेच पुणे पुस्तक जत्रेच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या आयोजनात राजन आणि शिरीष चिटणीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निमंत्रित लेखकांचे स्वागत, कार्यक्रमाचे नियोजन आणि संवादासाठी आत्मीय वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमानंतर लेखकांनी सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या स्टॉलला सदिच्छा भेट दिली. समारोपप्रसंगी शिरीष चिटणीस यांनी आभार मानले.

Advertisement

फोटो ओळ
श्री रामदास नेहुलकर मार्गदर्शन करताना, समवेत शिरीष चिटणीस, आशिष तागडे व अन्य मान्यवर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!