महाराष्ट्रात मॉन्सून वेळेवर
भारतीय हवामान खात्याकडून माहिती
मुंबई : बळीराजाला ज्या वरुणराजाची आतुरता असते, तो यावेळी महाराष्ट्रात वेळेवर दाखल होणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यंदा 31 मे ला केरळात मान्सून दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तळकोकणातही वेळेवरच पावसाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी 04 जूनला मान्सून केरळात दाखल होणार असे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात येत होते. मात्र, तसे झाले नाही आणि 08 जूनला केरळात पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. तर, त्यानंतर राज्यात 11 जूनला मान्सूनने हजेरी लावली. त्यामुळे आता 31 मे ला केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणतः 07 जूनला तळकोकणात पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होत असून ला निनोची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे यावेळी देशात चांगल्या पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंदी महासागराच्या पट्ट्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निनो परिस्थिती निर्माण होईल. त्याचा परिणाम नैऋत्य मान्सूनवर होऊन यावेळी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी सांगितले आहे.
