तारक मेहताचा निर्माता असित मोदी लैंगिक छळ प्रकरणी दोषी


अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने केला होता खटला दाखल
मुंबई
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्माचा निर्माता असित मोदी याला लैंगिक छळ प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. तारक मेहता मालिकेतील मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने असित कुमार मोदीसह तिघांवर लैंगिक छळाचा खटला दाखल केला होता.या प्रकरणी स्थानिक समितीने जेनिफरला थकीत मानधन आणि नुकसानभरपाई म्हणून पाच लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहे. मात्र निकाल लागून 40 दिवस उलटूनही आरोपींनी पैसे दिले नसल्याचे जेनिफरने म्हटले आहे. यामुळे अभिनेत्री अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
जेनिफर म्हणाली की, मी खटला जिंकला आहे, याचे समाधान आहे मात्र मी आनंदी नाही. कारण निकाल लागून 40 दिवस उलटून गेले तरी मला माझे थकित मानधन मिळालेले नाही. जवळपास 25 ते 30 लाख रुपये मानधन थकलेले असल्याचे जेनिफरने सांगितले.
गेल्या वर्षभरात मला कोणत्या संकटाला सामोरे जावे लागले, हे माझे मलाच माहीत आहे. या निकालाने मी केलेले लैंगिक छळाचे आरोप खोटे नव्हते हे सिद्ध केले आहे. मात्र माझे थकित मानधन मला अदा करण्यात आले नाही. उलट आरोपी काहीच झाले नाही अशा थाटात समाजात वावरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि माझे थकलेले मानधन त्वरीत मिळावे, असे जेनिफरने म्हटले आहे.
गोरेगाव फिल्मसिटी आणि सिंगापूरमध्ये मालिकेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी निर्माते असित मोदी याच्या विरोधात मुंबई पोलिसात 20 जून 2023 रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. असित मोदी यांच्यासोबत आणखी दोन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. असित मोदी बरोबरच शोचे ऑपरेशन हेड सोहेल रमानी आणि प्रोड्युसर जतिन बजाज याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पवई पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 509 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!