संगीतामध्ये तणाव मुक्तीची ताकद-मुकुंद फडके
दीपलक्ष्मी सभागृहांमध्ये गाण्यांची मैफल संपन्न
सातारा
संगीतामध्ये माणसाला तणावमुक्त करण्याची ताकद आहे.कोणत्याही व्यक्तीने संगीत ऐकण्याचा किंवा गाणी गाण्याचा छंद जोपासला तर तणावमुक्त जीवन जगणे शक्य होते असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले.
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित आणि गोल्डन इरा म्युझिकल ग्रुप सातारा प्रस्तुत ‘मेरी आवाजही पहचान है’ आहे हा जुन्या हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम दीपलक्ष्मी सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सुश्राव्य संगीत ऐकणे किंवा एक गायक कलाकार म्हणून संगीताची आराधना करणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यामुळे मानवी जीवनाला शिस्त लागते .संगीत किंवा नृत्य अशा छंदांची जोपासना करणाऱ्यांना दीर्घायुष्य प्राप्त झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसत असे मुकुंद फडके म्हणाले.
यावेळी शिरीष चिटणीस यांनी दीपलक्ष्मी सभागृहात सातत्याने अशा प्रकारचे कार्यक्रम सादर करून संगीताला आणि कलेला प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले.यावेळी ते म्हणाले आपणाला आभासी जगात जगायची सवय झाल्याने आपण भावभावनांपासून दूर जात आहोत.कराओके कार्यक्रम हे महाराष्ट्र आणि देशभर होत असून लोक घरातून बाहेर पडून अशा कार्यक्रमाला हजेरी लावत सहभागी पण होत आहेत.संगीत कार्यक्रमामुळे टीव्ही आणि मोबाईलपासून बाजूला होऊन ते लोकांच्यात येऊन संवाद साधत आहेत.
डॉ सारिका देशपांडे म्हणाल्या ,कार्यक्रमात सादर झालेल्या गाण्यांमुळे श्रोत्यांच्याही विस्मरणात गेलेल्या गाण्यांना उजाळा मिळाला.कलाकारांनी मराठी गाणी मोजकीच म्हटली तरी तीही छान झाली.केवळ दोन कलाकारांनी गाणी सादर करणे सोपे नसते पण सौ.अपर्णा गायकवाड आणि श्री.प्रवीण जांभळे यांनी ते आव्हान लीलया पेलले
यावेळी सौ.अपर्णा गायकवाड आणि श्री.प्रवीण जांभळे यांनी काही सोलो,काही डुएट्स गाणी सादर केली.जुन्या गाण्यांबरोबरच 90 च्या दशकातील नदीम श्रवण,अनु मलिक यांनी संगीत दिग्दर्शित केलेली गाणी गाऊन श्रोत्यांची वाहवा मिळवली

