यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जागतिक वारसा सप्ताह
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे संवर्धन करण्याचा अर्थपूर्ण प्रवास
सातारा
जागतिक वारसा सप्ताह 2025 ला सातारा येथील यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रेरणादायी सुरुवात झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (IIA) सातारा सेंटरच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (MERI), ICOMOS India, INTACH, BNCA च्या सेंटर फॉर कल्चरल स्टडीज, अर्बन स्केचर्स सातारा, रोटरी क्लब सातारा आणि लायन्स क्लब सातारा या ज्ञान भागीदार संस्थांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम अधिक समृद्ध झाला.
कार्यक्रमाची सुरुवात यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या विश्वस्त आर्किटेक्ट स्वराली सगरे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स IIA सातारा सेंटरचे चेअरमन आर्किटेक्ट विपुल सालवणकर यांच्या स्वागतपर मनोगत व्यक्त करण्याने झाली. सदरच्या कार्यक्रमासाठी यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष मा. प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे आणि यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य आर्किटेक्ट सुहास तळेकर यांनी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले.
उद्घाटन सत्राची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली, त्यानंतर विविध तज्ज्ञांच्या व्याख्यानांनी साताऱ्याच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या बहुआयामी पैलूंवर प्रकाश टाकला. एसएमईएफच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. वैदेही लवांड यांनी “ऐतिहासिक शहर वाचूया !” या विषयावर खासव्हिडिओ व्याख्यान सादर केले.
यानंतर लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, साताराचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. शेखर मोहिते यांनी “कास पठार – साताऱ्याचा जागतिक नैसर्गिक वारसा” या विषयावर माहितीपूर्ण सादरीकरण केले. तीन दशकांच्या अध्यापन व संशोधन अनुभवाच्या आधारे त्यांनी कास पठाराचे पर्यावरणीय महत्त्व, जैवविविधता आणि जागतिक स्तरावरील मूल्य अधोरेखित केले. युनेस्कोच्या मूल्यमापन पथकासमोर कास पठार सादर करतानाचे अनुभवही त्यांनी उपस्थितांसोबत शेअर केले.
अंतिम सत्रात MERI चे अध्यक्ष आणि सातारा जिल्ह्याचे माजी मानद वन्यजीव रक्षक श्री. सुनील भोईटे यांनी “पश्चिम घाट – वारसा स्थळे” या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. सह्याद्री पर्वतरांगांची पर्यावरणीय संवेदनशीलता, नव्याने आढळणाऱ्या जैवविविधतेच्या प्रजाती आणि संरक्षणासाठी आवश्यक लोकसहभाग यांविषयी त्यांनी चिंतनपर माहिती दिली.
कार्यक्रमाचा समारोप प्राध्यापक, विद्यार्थी, वारसा तज्ञ आणि स्थानिक संस्थांच्या सहभागातून झालेल्या संवाद सत्राने झाला. येत्या आठवड्यातील विविध क्षेत्रभेटी, ट्रेक, दस्तावेजीकरण उपक्रम आणि साताऱ्याच्या ऐतिहासिक तसेच पर्यावरणीय स्थळांवरील जनजागृती कार्यक्रमांविषयी उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने प्रतिक्रिया नोंदवल्या.
यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स IIA सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला वारसा सप्ताह 2025 हा साताऱ्याच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे आकलन, अनुभव आणि संवर्धन करण्याचा अर्थपूर्ण प्रवास ठरणार आहे.

