काँग्रेसला आणखी एक धक्का
पैसे नसल्याने उमेदवाराची माघार
पुरी :
गुजरातमध्ये सूरत आणि मध्य प्रदेशातील इंदौरनंतर आता आणखी एका ठिकाणी काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने पैसे नसल्याचं कारण देत तिकीट परत दिलंय. ओडिशातील पुरी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी तिकीट नाकारलं.त्यांच्याविरोधात भाजपचे दिग्गज नेते संबित पात्रा मैदानात आहेत. काँग्रेस उमेदवार मोहांती यांनी माघार घेतल्याने संबित पात्रा यांच्यासाठी निवडणूक सोपी झाली.
पुरीमधून काँग्रेसचं तिकीट परत देणाऱ्या मोहांती यांनी सांगितलं की, पक्षाकडून निधी मिळत नाहीय. अशा स्थितीत माझ्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत. सुचारिता यांनी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल राव यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यात पक्षाकडून निधी न मिळाल्याने प्रचार करू शकत नसल्याचं सांगितलं होतं. पुरी मतदारसंघात २५ मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
पुरीमधून मोहांती यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. संबित पात्रा यांना यामुळे थेट आव्हान मिळालं होतं. पण आता मोहांती यांनी माघार घेतल्यानं संबित पात्रांसाठी लढत सोपी बनली. याआधी सूरतमध्ये काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभनी यांचा अर्ज रद्द ठरला होता. याशिवाय इतर उमेदवारांनी माघार घेतल्यानं भाजपचे मुकेश कुमार बिनविरोध विजयी झाले.
मध्य प्रदेशातही काँग्रेस उमेदवाराने नाव मागे घेतल्यानं भाजप उमेदवारासाठी वाट मोकळी झाली. इंदौर लोकसभा मतदारसंघात प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं होतं. तिथं काँग्रेसने अक्षय बम यांना उमेदवार केलं होतं. पण अक्षय यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता या जागेवरही काँग्रेसचा उमेदवार नाही.
