पंडय़ाला वाचवले,राहुलला बसवले
टी-20 वर्ल्ड कपसाठी अनुभवी संघ
नवी दिल्ली
कुणाला डावलायचे आणि कुणाला निवडायचे या संभ्रमात अडकलेल्या निवड समितीने मध्यम मार्ग काढताना काहींना वाचवत आणि काहींना बसवत आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठीअनुभवी संघाची घोषणा केली.अंतिम संघात स्थान मिळवण्यात नेहमीच यशस्वी ठरणाऱया के. एल. राहुलला बसवण्याचे धाडसही दाखवले. तसेच हिंदुस्थानचा तिन्ही क्रिकेटचा स्टार असलेल्या शुबमन गिलला थेट राखीव संघात स्थान दिले आहे.
यष्टिरक्षकाच्या स्थानासाठी प्रचंड संघर्ष असल्यामुळे एकाची निवड करणे निवड समितीला शक्य नव्हते. त्यामुळे निवड समितीने के. एल. राहुलला वगळताना सध्या फॉर्मात असलेल्या संजू सॅमसनची दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवड करत त्याच्या खेळाला न्याय दिला आहे. त्याचप्रमाणे ऋषभ पंतला मुख्य यष्टिरक्षक म्हणून कायम ठेवले आहे. कार अपघातात जखमी झालेला पंत तब्बल दीड वर्षानंतर पुनरागमन करील.
निवड समितीने हिंदुस्थानी संघात अपयशी ठरूनही पूर्वपुण्याईच्या जोरावर काही खेळाडूंची निवड केली. मात्र आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱया खेळाडूंनाही संघात स्थान देत खेळाडूंना न्याय दिला आहे. यात संजू सॅमसन, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंची निव्वळ आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर निवड केली आहे.मात्र ऋतुराज गायकवाड, हर्षित राणा, रियान पराग, दिनेश कार्तिक, टी. नटराजनसारख्या खेळाडूंना स्थान मिळवता आलेले नाही.
संघात 15 खेळाडूंची निवड करताना अजित आगरकरच्या निवड समितीला प्रचंड कसरत करावी लागली आहे. संघ निवडल्यानंतर वाद होऊ नये तसेच अनुभवी खेळाडूंनाही संघात स्थान दिले जावे असे संतुलन साधताना निवड समितीने राहुलला वगळण्याचा निर्णय घेतला. तसेच शुबमन गिल आणि रिंकू सिंगला वगळणे कठीण असल्यामुळे त्यांना राखीव संघात स्थान देऊन वाद टाळला आहे.तसेच आयपीएलमध्ये अचूक आणि भेदक गोलंदाजी करणाऱया खलिल अहमद आणि आवेश खान यांनाही राखीव खेळाडू म्हणून वर्ल्ड कप वारीचे तिकीट दिले आहे. मात्र आयपीएलमध्ये पूर्णतः अपयशी ठरलेल्या मोहम्मद सिराजवर पुन्हा विश्वास दाखवत त्याला आणखी एक संधी दिली आहे.
हिंदुस्थानी संघ 31 वर्षांचा
टी-20 वर्ल्ड कपसाठी नेहमीच तरूण तडफदार खेळाडूंची निवड केली जाते, पण निवड समितीने अनुभवाला प्राधान्य दिले आहे. यात तिशीतले केवळ पाच खेळाडू असून उर्वरित दहाही खेळाडू तिशीपलीकडचे आहेत. यशस्वी जैसवाल हिंदुस्थानचा सर्वात तरुण खेळाडू (22 वर्षे 142 दिवस) असून कर्णधार रोहित शर्मा (37 वर्षे) सर्वात वयस्कर खेळाडू आहे. एवढेच नव्हे तर संघातील तीन खेळाडू पस्तिशीतले आहेत. त्यामुळे संघ सरासरी 31 वर्षांचा अनुभवी संघ ठरला आहे.
2022 साली दुबईत झालेल्या वर्ल्ड कपचे नेतृत्व रोहित शर्माकडेच होते. यंदाही तोच कर्णधार असून त्या संघातील दहा खेळाडूंची पुन्हा निवड करण्यात आली आहे. त्यात रोहितसह विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे. गेल्या वर्ल्ड कपसाठी जसप्रीत बुमराचीही निवड करण्यात आली होती, मात्र ऐनवेळी दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. तो यंदाही संघात आहे. मात्र यशस्वी जैसवाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे हे पाच खेळाडू आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळणार असून रवींद्र जाडेजाने तीन वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप संघात पुनरागमन केले आहे.
