भुताच्या भीतीने आत्महत्या
अमेरिकेहून पुण्यात येताच महिलेची मुलासह आत्महत्या
पुणे :
वाकडमधील युमाननगर इथं रेगलिया सोसायटीत ३२ वर्षीय महिलेनं ४ वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कोमल संकेत आवटे-हरिश्चंद्रे असं महिलेचं नाव असून विहान असं चार वर्षांच्या मुलाचं नाव आहे.महिलेने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून स्वत:सह मुलाला संपवलं. जखमी अवस्थेत दोघांनाही सांगवीतील रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
कोमल आणि संकेत यांचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. संकेत नोकरीनिमित्त अमेरिकेला गेले होते. त्यावेळी कोमलसुद्धा त्यांच्यासोबत गेली. दरम्यानच्या काळात कोमलला मानसिक आजाराचा त्रास सुरु झाला. स्वत:सह मुलाला कुणीतरी मारेल, माझ्या मागे भूत लागलंय अशी भीती वाटू लागली. यामुळे त्यांच्यावर अमेरिकेत उपचारही केले. पण त्रास सुरूच राहिल्याने शेवटी भारतात परतल्या. दोन दिवसांपूर्वीच कोमल आणि त्यांचा मुलगा भारतात आले होते.पुण्यात कोमल यांच्यावर उपचार केले जाणार होते. त्यासाठी डॉक्टरांची वेळही घेतली होती. त्याआधी कोमल आणि मुलगा विहान वाकडमधील घरी आले होते. सोबत सासू-सासरे आणि कोमलचे आई-वडीलसुद्धा होते. मानसिक त्रास होत असल्यानं कोमल जास्तच घाबरत होत्या. त्यातूनच शनिवारी पहाटे पाच वाजता त्यांनी अकराव्या मजल्यावरून चार वर्षांच्या चिमुकल्यासह उडी मारली.
कोमल आणि विहान रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ते पडले तेव्हा जोरात आवाज आला. शेजाऱ्यांनी सुरक्षारक्षकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कोमल यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. कोमल आणि विहान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोमलचे पती संकेत हे अंत्यसंस्काराला येऊ शकले नाहीत. अमेरिकेतून येण्यासाठी जास्त कालावधी लागत असल्यानं त्यांना पत्नी आणि मुलाचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही.
