सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगले केतकर साहित्य संमेलन


संमेलनाचा उत्साहात समारोप; विद्यार्थी, शिक्षक व साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती

सातारा,
‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्था व केतकर कुल महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर प्रथम मराठी साहित्य संमेलन 2026 अंतर्गत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व समारोप सोहळा लोकमंगल हायस्कूल, नागेवाडी कुशी (ता. जि. सातारा) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता हाटकर यांनी केले.
या प्रसंगी अजय आचरेकर, प्रकाश केतकर, सीमा जोशी, गीता भुर्के आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलाविष्कारांद्वारे मराठी साहित्य, संस्कृती आणि ज्ञानपरंपरेचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमात गीता भुर्के यांनी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे लिखित “वाऱ्यावरची वरात” हा नाट्यप्रवेश प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. तसेच सुगंधा दातार यांनी विद्यार्थ्यांसाठी रचलेला “ज्ञानदेवीचे विद्यादेवीचा गोंधळ” हा सांस्कृतिक आविष्कार सादर केला. या सादरीकरणात स्मिता इंगलगावकर यांनी सहकलाकार म्हणून सहभाग नोंदविला. गोंधळ गीतासाठी रमेश महामुलकर, श्रीनाथ सावंत, अथर्व चव्हाण आणि गौरव साळुंखे यांनी तबला व पेटीच्या सुरेल साथीद्वारे कार्यक्रमात रंगत आणली. सादर झालेल्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्रसाद गडकरी यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यालयास दहा हजार रुपयांची देणगी जाहीर करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Advertisement

समारोप कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व प्रभावी वक्ते प्राचार्य श्याम भुर्के यांनी मनोगत व्यक्त करताना संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी साहित्याची समृद्ध परंपरा जपण्याचे कार्य अशा संमेलनांमुळे अधिक प्रभावीपणे घडते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी आपल्या भाषणात मराठी भाषा टिकविण्यासाठी व तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे वैचारिक आणि साहित्यिक कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असे ते म्हणाले. या संमेलनाचे हस्तलिखित स्वरूपात संकलन करून ते सर्वांना उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच हे साहित्य संमेलन दरवर्षी नियमितपणे आयोजित करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस, प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत जमदाडे, मुख्याध्यापक विजय यादव, दत्तात्रय सावंत (पाटील), नितीनकुमार कसबे, शशिकांत जाधव, सतीश पवार, ज्ञानेश्वर मोहटकर, संदीप जाधव, बाळकृष्ण इंगळे, हणमंत खुडे, राहुल घोडके, विपुल लोहार, रमेश महामुलकर, दत्तात्रय शिर्के, जगदीश खंडागळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांची बहार, मराठी साहित्याविषयीची जागरूकता आणि डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या कार्याचा गौरव अशा विविध पैलूंनी सजलेले हे पहिले मराठी साहित्य संमेलन संस्मरणीय ठरले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!