खळांची व्यंकटी सांडो
न्यूजमंडी/पॉझिटिव्ह

अमेरिकेत घर सांभाळणाऱ्या पुरुषांच्या संख्येत वाढ
गृहिणींच्या संख्येत तब्बल 28% ने झाली घट
वॉशिंग्टन
आधुनिक काळात पती आणि पत्नी दोघेही नोकरी करत असताना घराचा कारभार कोणी पहायचा याबाबत नेहमीच संघर्ष होत असतो अनेक वेळा या कामाची जबाबदारी महिलांवर म्हणजेच गृहिणींवर येत असते कोणताही रोजगार न करता फक्त घर सांभाळणाऱ्या महिलांना नेहमीच होम मेकर किंवा गृहिणी म्हणून संबोधले जाते पण आता एका नव्या रिसर्चप्रमाणे अमेरिकेत घर सांभाळणाऱ्या पुरुषांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून गृहिणींची संख्या मात्र 28% ने कमी झाली आहे प्यु रिसर्च या संस्थेने गेल्या 30 वर्षातील सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणारे संशोधन केले असून त्यामधून हे निष्कर्ष समोर आले आहेत 1989 ते 2021 या कालावधीतील परिस्थितीवरील हे संशोधन केले असून त्याप्रमाणे घर सांभाळणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये 26 ते 28 टक्के घट झाली असून पुरुषांच्या बाबतीत मात्र हे प्रमाण 7% ने वाढले आहे या निष्कर्षाप्रमाणे ज्या पुरुषांची शैक्षणिक पात्रता थोडी कमी आहे अशा पुरुषांनी घरात राहून घर सांभाळण्याचा पर्याय निवडला आहे त्यांची सुशिक्षित पत्नी मात्र बाहेर नोकरी करत आहे या संशोधनातील आणखीन निष्कर्ष म्हणजे सर्वसाधारणपणे ज्या घराचा कारभार पुरुष पहात आहेत त्या घरांची आर्थिक स्थिती जेमतेम आहे विविध कारणामुळे पुरुषांनी घराचा कारभार सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे त्या कारणापैकी सर्वात महत्त्वाचे कारण बेरोजगारी हेच मानले जात आहे म्हणजेच घरातील पुरुषाला कोणताही रोजगार उपलब्ध होत नसेल तर घर सांभाळण्याची जबाबदारी त्याने उचलली आहे पुरूषांनी घर सांभाळण्याच्या इतर कारणांमध्ये शारीरिक व्यंग असणे,अपंगत्व असणे किंवा निवृत्त असणे ही कारणे सुद्धा समोर आली आहे
न्यूजमंडी/ज्ञानकोश

भारताचे पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू
पं. नेहरू हे देशातील सर्वाधिक काळ राहिलेले पंतप्रधान आहेत. पं. नेहरू हे सलग 16 वर्षं पंतप्रधान राहिले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, पंतप्रधान म्हणून दोन टर्म पूर्ण केल्यानंतर पं. नेहरूंची पंतप्रधानपदी राहिण्याची इच्छा नव्हती.केरळ लिटरेचर फेस्टिवलमध्ये काँग्रेसचे खासदार आणि नेहरू- इन्वेन्शन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक शशी थरूर यांनी सांगितलं होतं, “पं. जवाहरलाल नेहरूंनी 1958 मध्ये आपला राजीनामा दिला आणि हिमालयात काही महिन्यांसाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. अनेक वर्षं आपण देशाची सेवा केली आहे तेव्हा आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे. इतर कुणीतरी आता ही जबाबदारी स्वीकारावी असं पत्र पं. जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेस वर्किंग कमिटीला लिहिलं होतं. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी राजीनामा तर दिला पण त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास कुणीच तयार नव्हतं. भारतातील काँग्रेसचे नेते, देशातील जनता इतकंच काय तर अमेरिका आणि रशियाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी नेहरूंना गळ घातली की तुम्ही राजीनामा देऊ नका.”सर्व बाजूंनी दबाव निर्माण झाल्यावर पं. नेहरूंना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. पं. नेहरूंनी सहा महिन्यांसाठी हिमालयात सुट्टी घेण्याची तयारी केली होती पण त्यांना केवळ 15 दिवसात परत यावे लागले आणि पुन्हा पंतप्रधानपदाची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी लागली.”यावरुनच आपल्याला नेहरूंची लोकप्रियता आणि त्यांची जनमानसातील प्रतिमा कशी होती याची कल्पना येऊ शकते.

न्यूजमंडी/सुविचार
१. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परीस्थितीमधून जावंच लागते.
२. अनेकवेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जाते.
३. नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते

न्यूजमंडी/विनोद
आयुष्य
कोणीतरी खरंच म्हणून गेलंय कि,
आयुष्य फक्त २ दिवसाचं आहे..
शनिवार आणि रविवार
आणि हि गोष्ट आपल्याला सोमवारी पटते..
मावशी
मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते…
हॅलो फ्रेंड्स, मी मावशी झाले
बंड्याने खाली Comment टाकली…
कोणत्या हॉस्पिटलला? किती पगार आहे…?
गोवा
पिंटया: गोव्याला चाललोय जातांना रस्त्यात बायकोला दरीत टाकून देणार आहे,
चिंटया: माझी पण घेऊन जा आणि ढकल,
पिंटया: तुझी येतांना ढकलली तर चालेल का?
न्यूजमंडी/खाद्ययात्रा

पनीर बुर्जी
साहित्य फ्रेश पनीर बनविण्यासाठी
1 लिटर दुध . 1/2 कप पाणी 1-2 टेबल स्पून व्हिनेगर .
बुर्जी बनविण्यासाठी :
1 टेबल स्पून तेल 2 टेबल स्पून बटर 1 टीस्पून बेसन 2 मध्यम कांदे बारीक चिरलेले 2 मध्यम टोमॅटो बारीक चिरलेले १” आलं लांबट चिरलेले 7-8 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली चवीनुसार मीठ 1/2 टीस्पून हळद 1 टीस्पून लाल तिखट 1/2 टीस्पून धने पावडर 1/4 टीस्पून जिरे पावडर 1/2 टीस्पून गरम मसाला गरम पाणी आवश्यकतेनुसार कोथिंबीर कसुरी मेथी 1-2 टेबलस्पून फ्रेश क्रीम
कृती
दूध एका भांड्यात गरम करायला ठेवा. त्याला उकळी आली की मंद आच ठेवून व्हिनेगर व पाणी यांचं मिश्रण थोडं थोडं घालून हळुवारपणे ढवळा. दूध फाटायला लागलं की व्हिनेगर घालणं बंद करा आणि गॅस बंद करा. एका भांड्यावर कॉटन कपड्यात हे मिश्रण ओतून घ्या म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल. त्यात चांगलं पाणी घालून पनीर धुवून घ्या. म्हणजे व्हिनेगरचा आंबटपणा निघून जाईल. (व्हिनेगर नसेल तर लिंबूरस घालू शकता) कपड्यातील पनीर तसंच कपड्यावर खाली चाळण ठेवून त्यावर ठेवा म्हणजे त्यातलं अतिरिक्त पाणी निघून जाईल. हे फ्रेश पनीर तयार
कढईत बटर व तेल घालून त्यात बेसन घालून थोडंस भाजुन घ्या. त्यातच लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आल्याचे लांबट तुकडे घालून मोठ्या आचेवर २ मिनिटे परता.आता मीठ, हळद, तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला घालून २ मिनिटे परतून घ्या. नंतर गरम पाणी आवश्यकतेनुसार घालून परत २ मिनिटे शिजवा.मसाले सर्व शिजले की त्यात होममेड पनीर हाताने कुस्करून घाला. त्यावर कोथिंबीर, पुदिना पाने चिरून घालून पनीर बुर्जीत सर्व मसाले चांगले मिक्स झाले की परत थोडे लागेल तसे पाणी घालून २ मिनिटे शिजवा वरून फ्रेश क्रीम, कसुरी मेथी व कोथिंबीर टाकून मिक्स करा
खायला तयार आहे पनीर बुर्जी.
