कोलकाता टीम मालामाल
उपविजेत्या हैदराबादवरही पैशांचा पाऊस
चेन्नई
आयपीएल २०२४ मधील ७४ सामन्यानंतर या स्पर्धेचा विजेता कोलकाता नाईट रायडर्संच्या रुपाने मिळाला. तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या केकेआर संघावर बक्षिसाच्या रुपाने पैशाचा पाऊस झाला. उपविजेत्यासह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहिलेल्या संघांना कोट्यवधी रुपये मिळाले.
आयपीएल २०२४च्या फायनल सामन्यात कोलकाताने हैदराबादवर मात करत १० वर्षांनी विजेतेपद पटकावले. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरला ट्रॉफीसह २० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. पण केवळ केकेआरवरच कोट्यवधी रुपयांचा वर्षाव झाला नाही, तर जेतेपदाच्या लढतीत पराभूत झालेल्या हैदराबादलाही कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळाले.पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादला उपविजेतेपदासाठी १२.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर टूर्नामेंट पूर्ण करणारे संघही करोडपती म्हणून परतले. राजस्थान रॉयल्स संघ तिसरा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या स्थानावर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांना अनुक्रमे ७ आणि ६.५ कोटी रुपये मिळाले.
सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात सर्व १० गडी गमावून ११३ धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावांची खेळी खेळली. केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने शानदार गोलंदाजी केली. त्याने २.३ षटकात ७.६च्या इकॉनॉमीसह १९ धावा दिल्या आणि ३ बळीही घेतले. त्यांच्याशिवाय हर्षित राणा आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात कोलकाताने १०.३ षटकांत २ गडी गमावून ११४ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने अर्धशतक (५२) केले. रहमानउल्ला गुरबाजने ३२ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली.
