जागतिक वारसा सप्ताह २०२५ निमित्त पाटेश्वर ट्रेक


विद्यार्थी, वास्तुविशारद आणि वारसा क्षेत्रातील घटक एकत्र

Advertisement

सातारा
यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (YCA), सातारा आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (IIA) – सातारा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक वारसा सप्ताह २०२५ च्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक पाटेश्वर मंदिर संकुल येथे वारसा ट्रेक आयोजित करण्यात आला. या उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर वास्तुविशारद, प्राध्यापक, वारसा विषयक अभ्यासक आणि स्थानिक समुदायातील विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त आर्किटेक्ट स्वराली सगरे आणि IIA सातारा सेंटरचे अध्यक्ष आर्किटेक्ट विपुल सालवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत वारसा जतन व संवर्धनासाठी सामूहिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. संपूर्ण ट्रेकदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी स्केचिंग, फोटोग्राफी आणि प्रत्यक्ष स्थळ अवलोकनाच्या माध्यमातून निसर्ग, वास्तुरचना आणि सांस्कृतिक वारसा यांच्यातील नाते अनुभवले.
सदर उपक्रम यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष मा. प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष मा. प्रा. अजिंक्य सगरे आणि यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चे प्राचार्य आर्किटेक्ट सुहास तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे वारसा शिक्षणाला अधिक अर्थपूर्ण दिशा देण्याचे काम घडून येत आहे.
हा वारसा ट्रेक डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि इंडियन नेशनल ट्रस्ट फॉर आर्ट एंड कल्चरल हेरिटेज पुणे चॅप्टरचे आर्किटेक्ट सौरभ मराठे यांनी मार्गदर्शित केला. त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनामुळे सहभागी विद्यार्थ्यांना पाटेश्वर येथील शैलगृह, शतकानुशतके जुनी शिल्पकला आणि विस्तीर्ण मंदिर समूह यांचे वास्तुशिल्पीय, सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व अधिक सखोलपणे समजले. या प्राचीन वास्तू प्रादेशिक इतिहासाच्या विविध थरांची साक्ष देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अनेक सहभागींसाठी हा ट्रेक केवळ सहल न राहता एक जिवंत वारसा अनुभव ठरला. दगडात कोरलेल्या इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन घेत त्याचे सर्जनशील पद्धतीने दस्तऐवजीकरण करण्याची संधी या उपक्रमातून मिळाली. पाटेश्वर ट्रेकच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये वारसा विषयक नवचैतन्य निर्माण झाले असून उर्वरित जागतिक वारसा सप्ताह कार्यक्रमांसाठी उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!