‘एनआयए’च्या पथकावर हल्ला
बंगालमध्ये वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
कोलकाता
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकावर पश्चिम बंगालमध्ये जमावाकडून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत एनआयएच्या पथकावर जमावाकडून अचानक दगडफेक करण्यात आली. तसेच पथकातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये एनआयएच्या पथकातील दोन अधिकारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
डिंसेबर २०२२ च्या भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एक पथक या ठिकाणी दाखल झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणात तीन जणांचा मुत्यू झाला होता. यासंदर्भातील तपास एनआयएकडून सुरु असून यासाठी भूपतीनगर येथे आलेल्या पथकावर संतप्त जमावाकडून हल्ला करण्यात आला. यावेळी दगडफेक करत अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना ६ एप्रिल रोजी पहाटे घडली. या घटनेत दोन अधिकारी जखमी झाले आहेत.
पथकावर हल्ला झालेल्या प्रकरणात पोलिसांनी काहींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या आठ नेत्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात काहींना नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यानंतर एनआयएचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले असता त्यांच्यावर जमावाने हल्ला केला.पश्चिम बंगालमध्ये याआधी एकदा ईडीच्या पथकावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला होता. पश्चिम बंगालच्या संदेशाखाली भागात ईडीच्या पथकावर हल्ला झाला होता. यावेळी १०० हून अधिक जणांच्या जमावाने हल्ला केला होता. या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचे माजी नेते शेख शाहजहान हे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना २९ फेब्रुवारी रोजी बंगाल पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
