संजय राऊत यांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा
आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय
सांगली
महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही लोकसभेच्या जागावाटपावरून धुसफुस सुरू आहे. विशेष करून सांगलीच्या जागेवर शिवसेना उबाठा गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारालाही सुरूवात केली आहे. त्यावरुन काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगलीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. काँग्रेसने दिल्लीवर लक्ष ठेवावे, गल्लीतल्या राजकारणात पडू नये, असा सल्ला राऊत यांनी दिला.
पत्रकारांना माहिती देताना संजय राऊत म्हणाले, “संपूर्ण देशात एक चांगले वातावरण निर्माण झालेले आहे. सांगलीची जागा हा काँग्रेससाठी वादाचा विषय होऊ शकत नाही. सांगलीची जागा महाविकास आघाडीची आहे. तसेच महाराष्ट्रातील ४८ जागा कोण्या एका पक्षाच्या नसून त्या महाविकास आघाडीच्या जागा आहेत. महाविकास आघाडी म्हणून जर आम्ही एकत्र लढलो, तर त्याचे चांगले परिणाम दिसतील. याचा फायदा काँग्रेसलाच केंद्रात होऊ शकतो. सांगलीची लढाई सुद्धा काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा यासाठी आहे. काँग्रेसला त्यांचा पंतप्रधान नको असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे.”
“काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये. आला तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय निवडणूक लढवली जाईल. हिंदकेसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये. तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात, त्या उंचीवर राहा. सांगलीतले आम्ही बघून घेऊ”, असा इशारा शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.
रामटेकमध्ये आमचा विद्यमान खासदार होता. तरीही हा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला. कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती शाहूंना पाठिंबा दिला. अमरावतीची जागा शिवसेना ३० वर्षांपासून लढत आहे. तीही आम्ही काँग्रेसला दिली. त्यामुळे सांगलीबाबत काँग्रेसने एवढा तिढा निर्माण करू नये. आम्ही आता मैदानात उतरलो आहोत. आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय हे आमचे धोरण आहे, त्यानुसार शिवसेना आतापर्यंत वाटचाल करत आला आहे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.
