कमी मतदानाच्या केंद्रांवर जागृती
कृष्णानगर, पिरवाडीला अभियान
सातारा
पन्नास टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या कृष्णानगर,पिरवाडी येथील कमी मतदान झालेल्या विविध मतदान केंद्रांच्या अनुषंगाने मतदान जागृती करण्यात आली. यावेळी कोरेगावच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, बालविकास प्रकल्प अधिकारी तथा जागृती विभागाचे समन्वय अधिकारी सुजितकुमार इंगवले पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर उपस्थित होते. या अभियाना अंतर्गत कृष्णानगरचे गोकुळ विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मेळावे घेण्यात आले. मेळाव्यांना ब्लॉक लेवल ऑफिसर, तलाठी ,नागरिक ,पालक उपस्थित होते .यावेळी गटविकास अधिकारी चव्हाण म्हणाल्या “कमी मतदान असणाऱ्या केंद्रांवर विशेष जागृती गरजेची आहे. सुदृढ लोकशाहीसाठी उत्कृष्ट मतदान गरजेचे आहे. 50% पेक्षा कमी मतदान होणे हे भूषणावह नसून येथील मतदान वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच नागरिकांनी जागरूक राहावे. स्वतः मतदान करावे आणि इतरांनाही मतदान करण्यास उद्युक्त करावे.”यावेळी मतदानाची शपथ सर्व उपस्थित नागरिकांना देण्यात आली. विविध उपक्रम राबविण्याचे यावेळी नियोजन करण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुजितकुमार इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले. श्री क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. गोकुळ शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा कारखानिस यांनी आभार मानले
