डहाके यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद हे उत्तुंग कार्य


डॉ. लवटे यांचे प्रतिपादन; प्रा.प्रेरणा उबाळे यांचा सन्मान सोहळा
पुणे
डॉ. प्रेरणा उबाळे यांनी वसंत आबाजी डहाके यांच्या कवितांचे हिंदीमध्ये केलेले अनुवाद हे उत्तुंग कार्य असून डहाके यांच्या काव्य संग्रहाचा हिंदीत अनुवादित करून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ हिंदी साहित्यिक व भाषांतरकार, प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
डॉ. प्रेरणा उबाळे यांना हिंदी साहित्य अकादमी मुंबई यांच्या वतीने मामा वरेरकर कांस्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याबद्दल त्यांचा दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. लवटे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. दामोदर खडसे होते.यावेळी प्रख्यात हिंदी साहित्यिक सुनील देवधर, ‘केसरी’चे सहसंपादक रामदास नेहूलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य लवटे म्हणाले, वसंत आबाजी डहाके यांचे साहित्य वाचणे आणि ते समजावून घेणे याच्यात खूप अंतर आहे. ते विचार करून लिहितात. ते कविता लिहिणे जबाबदारी मानतात.त्यांच्या कविता माणसाच्या मनातील अस्वस्थता व्यक्त करणार्‍या आहेत. अक्षर गिरवण्यासाठी कविता नसतात तर अक्षर रुजविणारी कविता असावी. कविता अनुवाद करणे हे जोखमीचे काम असते. ते कार्य उबाळे यांनी करून दाखवलेले आहे. कवितेचे अनुवाद करणे हे साहस होय.
ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. दामोदर खडसे म्हणाले,डहाके यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद मोलाचा असून त्यासाठी प्रेरणा उबाळे अभियनानंदनास पात्र आहेत अनुवाद करणे कठीण असते. गझल आणि मुक्त छंद भाव शोधणे त्याहून अवघड असते. हे अवघड काम सोपे करण्याचे कार्य कवितेच्या माध्यमातून उबाळे यांनी केले आहे. हिंदीमध्ये अनुवाद करणे ही सोपी गोष्ट नसून ते कार्य प्रेरणा उबाळे यांनी केले आहे.
यावेळी सुनील देवधर म्हणाले, या मराठीचा पहिला ग्रंथ मुकुंदराज यांचा विवेक सिंधू मानला जातो त्यानंतर मराठी कवितेचा प्रवाह बदलत गेला. केशवसुतांनी आपल्या एका कवितेमध्ये असे विचारले की कविता कशी असावी? कविता अशी नसावी? अर्थातच कविता स्वतःला रचत असते! केशवसुतांनंतर दुसरा मोठा बदल म्हणजे बा. सी. मर्ढेकर, बा. भ. बोरकर आणि कुसुमाग्रज यांची कविता. मर्ढेकरांपासून म्हणजे 1960 सालापासून जो बदल मराठीमध्ये दिसतो तोच बदल गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेत हिंदीत आढळून येतो. अर्थातच समाजात झालेले परिवर्तन किंवा घडलेला प्रसंग एकाच वेळेस कोणत्याही भाषेच्या कवीला प्रभावित करत असतो.
डॉ. प्रेरणा उबाळे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की वसंत आबाजी डहाके यांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. वसंत डहाके आणि प्रभा गणोरकर यांनी कविता सप्रसंग समजावून सांगितल्या. त्यामुळे अनुवाद करणे सोपे झाले.अनुवाद करण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. प्रत्येक कविता ही गंभीर आशयाची कविता आहे आणि त्याच प्रकारे अनुवादामध्येही समतुल्यता आणण्यासाठी मी प्रयत्न केला. मूळ कवितांमध्ये निराळ्या प्रतिमा, प्रतीक, रहस्यपूर्णता, गूढता असल्याने अनुवादामध्ये यादृष्टीनेदेखील समतुल्यता आणण्याचा प्रयत्न मी केला. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबईमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये शुन:शेपचे लोकांना आकर्षण वाटले आणि समिती सदस्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्याची आठवण प्रेरणा उबाळे यांनी सांगितली.प्रेरणा उबाळे यांनी सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दल शिरीष चिटणीस यांचे आभार मानले. सत्कार समारंभाच्या निमित्ताने आपली जबाबदारी वाढल्याचे ही सांगितले.

Advertisement

यावेळी दीप लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस म्हणाले, हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हिंदी पोहोचवण्याचे कार्य होत असले तरी उबाळे यांनी सेवेच्या माध्यमातून कार्य करून कविता लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी उचलली आहे. मराठी कवितांचे भाषांतर हिंदीत करणे ही सोपी गोष्ट नसून कविता समजावून त्या लोकांपर्यंत रसग्रहणाद्वारे पोहोचवतात.
रामदास नेहुलकर म्हणाले, मराठीतील दर्जेदार साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादित झाल्याने ते मोठ्या संख्येने वाचले जाईल. डहाके यांच्या काव्याचा नेमका आशय डॉ. उबाळे यांनी हिंदी वाचकांपर्यंत पोहचविला आहे. . कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्निल पोरे यांनी केले. सुत्रसंचालन शिरीष चिटणीस यांनी केले.निर्मोही फडके यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!