मूल्यांची घसरण ही गंभीर बाब:राजीव खांडेकर
पुणे पुस्तक जत्रेत श्रीकांत कात्रे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीला श्रोत्यांची दाद
पुणे,
कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायव्यवस्था आणि माध्यमे हो लोकशाहीचे चार स्तंभ समाजातूनच येतात. समाजात चांगुलपणा वाढला तर हे स्तंभ मजबूत होतात. मात्र, सध्या समाज आणि माध्यमे राजकीय समर्थकांमध्ये विभागली गेली आहेत. सर्वच स्तंभांमधील नैतिक मूल्यांची घसरण आणि वाढता राजकीय- सामाजिक विस्कळीतपणा ही गंभीर चिंतेची बाब आहे, असे मत एबीपी माझा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले.
‘पुणे पुस्तक जत्रा’ उपक्रमांतर्गत टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्रात ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांची ‘मुशाफिरी पत्रकारितेची’ या विषयावर ज्येष्ठ संपादक श्रीकांत कात्रे यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष आणि ‘ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन’चे संचालक व माजी अध्यक्ष प्रकाश गवळी उपस्थित होते. साताऱ्यात भरलेल्या ६६ व्या अखिल भारतीय संमेलनाचे वेळी ते साताऱ्याचे नगराध्यक्ष होते. तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रा. श्रीनिवास हेमाडे, ऋता बावडेकर, संजय भालेराव, दयानंद माने यांचीही कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी तालुक्यातून शिक्षण घेतलेल्या खांडेकर यांनी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांत काम करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या मुलाखतीत त्यांनी आपल्या चार दशकांच्या पत्रकारितेतील संघर्ष, अनुभव आणि सामाजिक बांधीलकीचा प्रवास उलगडला. पाचवी ते सातवीत असतानाच वाचन, लेखन आणि नाटकातील आवडीमुळे पत्रकार होण्याचा निर्णय घेतल्याचे खांडेकर यांनी सांगितले. विजय कुवळेकर यांच्या संपादकपदाच्या काळात ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या खांडेकर यांनी नाशिकमध्ये पत्रकारितेची खरी पायाभरणी झाली. त्याकाळात केलेल्या संघर्षामुळे खूप काही शिकता आले, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत काम करण्याची संधी १९९५ मध्ये मिळाल्यानंतर कावेरी पाणीप्रश्न, काश्मीर मुद्दा यांसारख्या राष्ट्रीय विषयांचे वार्तांकन केल्याने आपल्या विचारांचा आवाका व्यापक झाला. दिल्लीतील पाच वर्षांच्या कालावधीत चार पंतप्रधान बदलताना पाहिले. राष्ट्रीय पातळीवरील नेते, मंत्री व खासदारांशी संवाद साधल्याने अनुभव आणि नेटवर्किंग वाढले. मात्र, केवळ राजकीय वार्तांकनात अडकून न राहता समाजासाठी ठोस योगदान देण्याच्या हेतूने दिल्लीतून पुन्हा महाराष्ट्रात आल्याचे त्यांनी नमूद केले.
पुस्तक खरेदीतील गैरव्यवहार उघडकीस आणणे तसेच अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमधील गंभीर दुरवस्थेवर थेट वार्तांकन करून प्रशासन हलवणे, असे सामाजिक परिणाम साधणारे विषय त्यांनी मांडले.
समाजातील प्रेरणादायी व्यक्तींना लोकांसमोर आणण्यासाठी ‘माझा कट्टा’ उपक्रम सुरू केला. ‘माझा कट्टा’वर अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकरी आत्महत्यांवर व्यक्त केलेली आर्त भावना व आवाहनातून पुढे ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना झाली, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना व दुष्काळी भागांना मदत झाली, असे त्यांनी सांगितले. पत्रकाराने स्वतःला ‘समाजाचा वकील’ मानले पाहिजे. समाजात काही चांगले घडते त्याचा पुरस्कार करणे आणि वाईट किंवा अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे हाच पत्रकाराचे मूलमंत्र आहे. सध्या डिजिटल व सोशल मीडियामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांची मक्तेदारी संपली असून, ध्रुव राठीसारख्या उदाहरणांवरून स्पष्ट होते की स्वतःचे स्वतंत्र विचार मांडण्यासाठी आता प्रत्येकाकडे व्यासपीठ उपलब्ध आहे, असे खांडेकर यांनी नमूद केले.
शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ‘‘पुणे पुस्तक जत्रा’ अंतर्गत “पुस्तकांच्या गराड्यात जाऊन” लेखक, कवी आणि पत्रकारांनी रसिकांशी संवाद साधावा, या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक जत्रेतील सर्वात महत्त्वाची व मुख्य मुलाखत म्हणजे श्रीकांत कात्रे यांनी घेतलेली राजीव खांडेकर यांची प्रकट मुलाखत होय.
श्रीकांत कात्रे आणि राजीव खांडेकर यांनी पत्रकारितेच्या सुरवातीच् काळात एकत्र काम केले आहे. खांडेकर यांची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती नसून राष्ट्रीय पातळीवर आहे. प्रचंड वाचन आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी संगीत, नाट्य व राजकारण अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांना अभ्यासू पद्धतीने बोलते केले आहे.’’ कार्यक्रमास राजीव खांडेकर यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्ष पाहणे व ऐकणे ही उपस्थित शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी स्फूर्ती ठरली. कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग व तांत्रिक व्यवस्थापन पाहणारे बाळकृष्ण इंगळे सर तसेच शिक्षिका शैला मॅडम यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे निमंत्रक पी. एन. आर. राजन (संयोजक) आणि शिरीष चिटणीस (समन्वयक) यांनी उपस्थितांचे आभार मानले.

