समाधानी ग्राहक हाच खरा जाहिरातदार:पराग काटदरे


पुणे पुस्तक जत्रेत ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांच्याशी मनमोकळा संवाद

पुणे,
समाधानी ग्राहक हाच ब्रँडचा खरा जाहिरातदार असतो. चवीतील सातत्य आणि गुणवत्तेत तडजोड न करणे हीच ग्राहकांच्या विश्वासाची गुरुकिल्ली आहे,” असे प्रतिपादन साताऱ्याचे प्रसिद्ध उद्योजक पराग काटदरे (काटदरे मसाले) यांनी येथे केले.
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे भरलेल्या २४ व्या ‘पुणे पुस्तक जत्रेत’ ‘मराठी उद्योजकाचा लोकल टू ग्लोबल प्रवास’ या विषयावर त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला गेला. ज्येष्ठ पत्रकार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली.
कार्यक्रमाला पराग काटदरे यांच्या पत्नी सौ. दीपा काटदरे, कन्या राधा,कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठ्या संख्येने रसिक वाचक उपस्थित होते. पुणे पुस्तक जत्रेचे संयोजक पी. एन. आर. राजन आणि समन्वयक शिरीष चिटणीस यांनी या मुलाखतीचे आयोजन केले होते.
पराग काटदरे यांनी आपल्या व्यवसायाची मुळे उलगडताना सांगितले की, १९५३ मध्ये आजोबांच्या मूळ किराणा दुकानात नुकसान झाल्यानंतर आजीच्या सूचनेनुसार आणि स्वावलंबनाच्या विचारातून सातारा येथे चटणी व मसाल्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली. १९७२ मध्ये साताऱ्याच्या भाजी मंडईत दुकान सुरू करून सायकलवरून गल्लोगल्ली विक्री सुरू झाली. या काळात वडिलांनी आणि कुटुंबाने अत्यंत खडतर कष्ट घेतले. तिसऱ्या पिढीत घरगुती व्यवसायाचे रूपांतर आधुनिक एमआयडीसी (MIDC) कारखान्यात आणि एका मोठ्या ब्रँडमध्ये झाले.
ब्रँड टिकवून ठेवण्यासाठीची पाच सूत्रे त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. ग्राहकांचा विश्वास व समाधान हा पहिला स्तंभ असून, समाधानी ग्राहकच ब्रँडचा खरा जाहिरातदार असतो. दुसरे म्हणजे कच्चा माल पुरवणाऱ्या पुरवठादारांचे वेळेवर पेमेंट करणे. तिसरे म्हणजे आर्थिक शिस्त — सर्व बँकिंग व शासकीय व्यवहार वेळेवर आणि पारदर्शक ठेवणे. चौथे म्हणजे कामगार संबंध — कर्मचाऱ्यांना कुटुंबाप्रमाणे जपणे; त्यांच्या कारखान्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला कर्मचारी कार्यरत आहेत. पाचवे म्हणजे दर्जा व चवीतील सातत्य, जे ग्राहकांच्या विश्वासाचे गुरुकिल्ली आहे.

सध्या १०० हून अधिक उत्पादने (मसाले, चटण्या, उपवासाचे पदार्थ, इन्स्टंट मिक्स) बाजारात उपलब्ध आहेत. पुढील ५ ते १० वर्षांत ४०० ते ५०० कोटी रुपयांची उलाढाल गाठणे आणि २००० लोकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. खाद्यप्रक्रिया क्षेत्रात गुणवत्ता तपासणी, हायजीन, पॅकेजिंग आणि सेल्स-मार्केटिंगमध्ये रोजगाराच्या अफाट संधी असल्याचा संदेश त्यांनी तरुणांना दिला.

यावेळी बोलताना शिरीष चिटणीस म्हणाले की, २००० सालापासून राजन यांच्या मार्फत (कोविडचे २ वर्षे वगळता) ‘पुणे पुस्तक जत्रा’ अविरतपणे भरवली जात आहे. यंदाच्या २४ व्या पुस्तक जत्रेत ७० हून अधिक स्टॉल्स आणि लाखो पुस्तके उपलब्ध आहेत. दररोज सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत ही जत्रा सुरू असून, दररोज विविध साहित्य-सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तकांचे प्रकाशन, परिसंवाद आणि मुलाखतीचे सत्र आयोजित केले जाते. केवळ लेखक-कवीच नव्हे, तर उद्योजक, कलाकार आणि विचारवंतांना वाचक-रसिकांसमोर आणून त्यांच्याशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे.

Advertisement

विनोद कुलकर्णी हे आरसपानी यूट्यूब चॅनेलचे प्रमुख असून त्यांचा मुलाखती घेणे हातखंडा असल्याने पराग काटदरे यांची मुलाखत खुलली.जशी कंदीपेढ्यांची ओळख साताऱ्याशी जोडलेली आहे, तशीच ‘काटदरे मसाले’ ही देखील आज सातारा व महाराष्ट्राची मुख्य ओळख बनली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून सुरू झालेला आणि तीन पिढ्यांच्या अथक कष्टांतून उभा राहिलेला हा ‘लोकल टू ग्लोबल’ प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे मुलाखतकार विनोद कुलकर्णी म्हणाले.

मुलाखतकार विनोद कुलकर्णी हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार आणि सातारा जनता बँकेचे माजी चेअरमन आहेत. साताऱ्यात झालेल्या ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन त्यांनी केले होते असे शिरीष चिटणीस यांनी सांगितले.

आजच्या डिजिटल युगात तरुणांनी मोबाईल आणि युट्यूबचा योग्य वापर करून स्पर्धा परीक्षांमध्ये व सैन्यात यश मिळवल्याची उदाहरणे असल्याचे चिटणीस म्हणाले. बदलत्या काळानुसार उद्योगात आणि समाजात तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अनिवार्य झाले आहे असे विनोद कुलकर्णी म्हणाले.

 

पराग काटदरे यांनी आपल्या व्यवसायाचे गुपित, चढ-उतार आणि भावी वाटचाल यावर अत्यंत मोकळेपणाने मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. काटदरे मसाले उद्योग समूहाने पुढील काळात ४०० ते ५०० कोटी रुपयांची उलाढाल गाठण्याचे आणि २००० लोकांना रोजगार देण्याचे ठेवलेले ध्येय कौतुकास्पद असल्याचे सांगण्यात आले. व्यासपीठावर व प्रेक्षकांमध्ये उपस्थित काटदरे कुटुंबातील नवीन पिढी, नातेवाईक आणि रसिक श्रोत्यांचे मनःपूर्वक स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले. पुणे पुस्तक जत्रेच्या व्यासपीठावरून अशा अनोख्या आणि प्रेरणादायी मुलाखती नेहमीच वाचकांपर्यंत पोहोचवल्या जातात, असे नमूद करून कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी पी. एन. आर. राजन म्हणाले की, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने आणि सूचनेनुसार २००० सालापासून ‘पुणे पुस्तक जत्रा’ आयोजित करण्यास सुरुवात झाली. कोरोना काळातील दोन वर्षे वगळता ही पुस्तक जत्रा सलग २४ वर्षे यशस्वीपणे भरवली जात आहे. यंदाच्या २४ व्या पुस्तक प्रदर्शनात ७० हून अधिक स्टॉल्स आणि हजारो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दररोज सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन खुले असून, दररोज सकाळी ११ वाजता, दुपारी ३ वाजता आणि संध्याकाळी ५:३० वाजता विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम पार पडतात.

ज्याप्रमाणे ‘कंदीपेढी’ ही साताऱ्याची ओळख आहे, त्याचप्रमाणे ‘काटदरे मसाले’ हा उद्योगही आज सातारा शहराची एक प्रमुख ओळख बनला आहे. काटदरे कुटुंबाने तीन पिढ्यांच्या खडतर परिश्रमांतून शून्यातून विश्व निर्माण करत साताऱ्यातील व्यवसायाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार केला आहे. या प्रेरणादायी प्रवासाची यशोगाथा पुणे शहरास केंद्रस्थानी ठेवल्यामुळे झाल्याचे पराग काटदरे यांनी स्पष्ट केले.वाचकांपर्यंत आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्योजक पराग काटदरे यांचे पुणे पुस्तक जत्रेच्या व्यासपीठावर मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!