प्राची देवकरला धावपटू नंदा जाधव पुरस्कार
रविवार दि.२० ऑक्टोबर रोजी पुरस्कार प्रदान समारंभ
सातारा
आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव स्मृती पुरस्कार नवोदित आंतरराष्ट्रीय धावपटू प्राची देवकर हिला देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीण जाधव यांनी दिली.मानचिन्ह व रोख रकमेचा यात समावेश आहे.
नंदा जाधव हिचा २५ वा स्मृतीदिन रविवार दि.२० ऑक्टोबर २०२४ रोजी गणेश मंदिर हॉल संभाजीनगर येथे साजरा होत असून प्रति वर्षाप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे.याच वेळी २०२४ चा नंदा जाधव स्मृती पुरस्कार किरपे ता.कराड येथील राष्ट्रीय धावपटू प्राची अंकुश देवकर हिला देण्यात येणार आहे.
सकाळी ९:०० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार असून क्रीडा प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. टी. आर.गारळे सो व सचिव श्री.सुरेश साधले यांनी केले आहे.

प्राची ही प्रशिक्षक श्री.अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.राष्ट्रीय शालेय स्पर्धेत ३००० मीटर व दक्षिण आशियाई मैदानी स्पर्धेत ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.दुबई येथे झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेत तिचा सहभाग होता व हाँगकाँग येथे होणाऱ्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत ती सहभागी होत आहे.
प्रतिष्ठान गेली २५ वर्ष रक्तदान शिबिर नवोदित खेळाडूंना सत्कार,आरोग्य शिबिरे,विविध क्रीडा स्पर्धांना मदत दिव्यांग स्पर्धेचे नियोजन आदी उपक्रम सातत्याने राबवत आहे.आतापर्यंत ३००० हून अधिक रक्तदात्यांनी नंदा जाधव हिच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी रक्तदान केले आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नंदा जाधव प्रतिष्ठानने केले आहे

