संस्कार भरती कथाकथन स्पर्धा अंतिम फेरी १५ ऑक्टोबरला
पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात होणार स्पर्धा
पुणे
संस्कार भारती आयोजित ‘कथाकथी २६’ या कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी १५ ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणार आहे. मराठी साहित्यात कथाकथन हा साहित्य प्रकार लोकप्रिय करणारे कै द मा. मिरासदार, शंकर पाटील व व्यंकटेश माडगूळकर ह्या त्रयिंच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने प्रांतातील सर्व जिल्ह्यांमध्ये कथाकथन स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. प्रांतातील ८ ठिकाणी या कथाकथन स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या संपन्न झाल्या. यास मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हा पातळीवर तीन क्रमांक काढण्यात आले असून यातील पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धकास पुणे येथे गुरुवारी, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘वाचन प्रेरणा दिनाच्या’ औचित्यावर होणाऱ्या अंतिम फेरीमध्ये जाण्याची संधी मिळाली आहे.
टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात सकाळी ११ ते २ यावेळेत अंतिम फेरीतील स्पर्धकांचे कथाकथन सादरीकरण व दुपारी ३ ते ४ यावेळेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न होत आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, संस्कार भारतीचे प्रांत अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, द.मा.मिरासदार यांचे बंधू हरिभाऊ मिरासदार, व्यंकटेश माडगुळकर यांच्या कन्या ज्ञानदा नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अंतिम फेरीतीतून ३ उत्कृष्ट सादरीकरणे काढली जातील. त्यांना शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि द. मा. मिरासदार यांच्या स्मरणार्थ करंडक व १०,०००/- रोख बक्षिस दिले जाईल.
स्थानिक कला रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्कार भारती पश्चिम प्रांत पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

