साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे


पुणे
पुणे येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत डॉ. लिंबाळे यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली.जानेवारी 2027 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे.
डॉ. शरणकुमार लिंबाळे हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि दलित साहित्याचे महत्त्वाचे अभ्यासक आहेत. त्यांच्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले. दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राची मांडणी करणारा ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ हा त्यांचा ग्रंथ विशेष महत्त्वाचा मानला जातो. ‘सनातन’, ‘झुंड’, ‘बहुजन’, ‘रामराज्य’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. त्यांच्या साहित्याचे हिंदी, इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले असून, काही साहित्य परदेशी भाषांमध्येही अनुवादित झाले आहे.डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी सुमारे 40 हून अधिक पुस्तकांचे लिखाण केले आहे. ते 2011 मध्ये नांदेड येथे झालेल्या 12 व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.2019 मध्ये झालेल्या 20 व्या राष्ट्रीय साहित्य संमेलनात त्यांना प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.’सनातन’ या कादंबरीसाठी त्यांचा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

Advertisement

निवडीच्या घोषणेनंतर शरणकुमार लिंबाळे म्हणाले, ‘ऐतिहासिक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला भूषवायला मिळतंय, याचा मला खूप आनंद झालाय. मी आजवर केलेल्या लेखनाची दखल घेतल्याबद्दल आभारी आहे. मराठी भाषेसाठी मी आजवर लिखाण केलंय. केवळ मीच नव्हे तर राज्यातील प्रत्येक लेखकाने मराठी साहित्यासाठी लिखाण केलंय. त्यामुळं मराठी भाषेचा हा गौरव यापुढंही अजरामर राहील, यासाठी माझ्यासह सगळेचं लेखक कार्यरत राहतील. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हे शंभरावे साहित्य संमेलन पार पडतंय, त्यामुळं कोणीचं उधळपट्टी करणार नाही. पण आता हे ऐतिहासिक साहित्य संमेलन आहे, त्यामुळं ते भव्यदिव्य करायला हवं. यावरुन टीका करणं हे योग्य नाही. यावरुन वाद निर्माण करु नयेत’,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!