भाजपची चार तास खलबतं


विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती ठरली
मुंबई
लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी राहिल्याने भाजपचे नेते विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सह प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चिंतन झाले. याबद्दल मुंबई भाजपचे अध्यक्ष शेलार यांनीही माहिती दिली.
बैठकीबद्दल बोलताना आशिष शेलार म्हणाले, “भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. साडेचार तास बैठक झाली. आम्ही विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप घेऊन पुढे जाणार आहोत. 10 जुलैपर्यंत 288 विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेणार आहोत. यात सहकारी पक्षांना आम्ही बरोबर घेणार आहोत. सहकारी पक्षाच्या नेत्यांसोबत चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका होतील.”
“विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवर प्लॅन घेऊन पुढे जाणार आहोत. आम्ही सरकार बनवू आणि जनतेची सेवा करू”, असेही शेलार यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत दूरावलेल्या मतदारांबद्दल बोलताना शेलार म्हणाले, “संघटनात्मक बदलाचा काही विषय नाही. सबका साथ, सबका विकास याच घोषणेवर भाजप काम करते. त्यामुळे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन या निवडणुका जिंकू. त्यांचा विश्वास संपादन करू. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचू. छोट्या छोट्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा पूर्ण रोडमॅप आहे.”
मोदींनी विधानसभेला जास्त सभा घ्याव्यात असे शरद पवार म्हणाले. त्यावर शेलार म्हणाले की, “त्यांच्या पोटातील ही भीती बोलत आहे. नक्कीच निवडणुकीत ते दिसेल. पवार साहेब असो वा महाविकास आघाडी… त्यांच्या पोटात मोदीजींच्या सभांची भीती भरली आहे. म्हणून ते अशा पद्धतीने विधान करत आहेत. मोदीजींच्याच नेतृत्वात आम्ही निवडणुका जिंकू”, असे शेलार यांनी म्हटले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!