सक्षमचा घे भरारी ” समारंभ संपन्न


४ लॅपटॉप व वैद्यकीय मदतीसह २.५ लाखांची मदत वितरित

सातारा
दिव्यांगत्व हे अपंगत्व नाही, ते एक वेगळं सामर्थ्य आहे, हे सिद्ध करणारा “घे भरारी….. ध्यास दिव्यांग सक्षमीकरणाचा” हा सोहळा आनंदाश्रम, सातारा येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात दिव्यांग लाभार्थी, त्यांचे पालक आणि सक्षमचे हितचिंतक व देणगीदार मिळून ६० जण उपस्थित होते.सक्षम, सातारा आयोजित या कार्यक्रमात होतकरू दिव्यांगांना शैक्षणिक मदत म्हणून ४ लॅपटॉप आणि इतर वैद्यकीय मदत असे मिळून एकूण रुपये २.५ लाख एवढा निधी वितरित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आनंदाश्रम, सातारा चे अध्यक्ष डॉ.अरविंद काळे उपस्थित होते. त्यांच्यासोबत हितचिंतक देणगीदार उद्योजक श्री.अनिल काटदरे आणि डॉ. महादेव कुंभार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सक्षमचे अध्यक्ष *श्री. भगवान पाटणे होते.


सौ.अंजली कुलकर्णी यांनी स्वागत गीत गायले. कार्यक्रमाची सुरुवात संत सूरदास प्रतिमा पूजनाने झाली. डॉ.अरविंद काळे, श्री.अनिल काटदरे, डॉ महादेव कुंभार, श्री.भगवान पाटणे यांच्या हस्ते पूजन झाले. संत सूरदासांचे पद “मैया मोरी मैं नहि माखन खायो” हे स्वागत गीत म्हणून वाजवण्यात आले. अध्यक्ष श्री.भगवान पाटणे यांनी प्रास्ताविकात सक्षम संस्थेचे कार्य – दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, वैद्यकीय उपचार, कायदेशीर सल्ला, सामाजिक व मानसिक पाठबळ – याची माहिती दिली.
सौ.रुक्मिणी शरद इंगवले (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) व श्री.शरद इंगवले (इंडियन रेल्वे) या पूर्ण अंध असलेल्या दांपत्याने विशेष मनोगत व्यक्त करताना दिव्यांग मुलांच्या पालकांनी खचून न जाता मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन केले. त्यांनी आपला संघर्ष मांडताना शिक्षण हे आयुष्यात परिवर्तन आणू शकते फक्त सोबत चिकाटी गरजेची असल्याचे सांगितले.

ज्यांना मदत मिळाली ते लाभार्थी –

Advertisement

१. कु.वेदिका अविनाश हगवणे – १०० टक्के अंध, इयत्ता ८ वी, कन्याशाळा, सातारा – शिक्षणासाठी लॅपटॉप २. कु.प्रतिक्षा नाना शेजूळ – मस्क्युलर डिस्ट्रॉफी,
१० वी ६६%, १२ वी ७४%, बी.ए., एम.ए. इकॉनॉमिक्स प्रथम श्रेणी, एल.एल.बी. ४ थे वर्ष, “हेल्पिंग लाईफ – चॅम्पियन ऑफ चेंज” अवॉर्ड विनर – शिक्षण व वकिलीसाठी लॅपटॉप ३. श्री.मनोजकुमार हिंगमिरे – अस्थिव्यंग ४६%, बी.कॉम., एम.कॉम., सोशल मीडिया मार्केटिंग, ग्राफिक डिझाईन, एआय, व्हिडिओ एडिटिंग – स्वावलंबनासाठी लॅपटॉप ४. कु.सायली बापू गाढवे – ९० टक्के अंध, बी.ए. द्वितीय वर्ष, स्पर्धा परीक्षा तयारी – शिक्षणासाठी लॅपटॉप ५. कु.प्रेरणा रविंद्र नांगरे – वय १२, थॅलेसेमिया, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी वैद्यकीय मदत ६. श्री.ओंकार गोरे – अस्थिव्यंग, ब्रेन ट्युमर रेडिएशनसाठी वैद्यकीय मदत ७. कु.महेक अमर मुलाणी – कर्णबधिर, १० वी ९१%, राज्यस्तरीय बालरंग गौरव पुरस्कार प्राप्त – विशेष सन्मान

सर्व मदत डॉ.अरविंद काळे, श्री.अनिल काटदरे, डॉ.महादेव कुंभार, श्री.भगवान पाटणे यांच्याहस्ते देण्यात आली.
यावेळी लाभार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना, “आम्हाला दया नको, संधी द्या. आज मिळालेला लॅपटॉप हा आमच्यासाठी फक्त यंत्र नाही, तर आमच्या भविष्याची चावी आहे,” अशी भावना व्यक्त केली. यावेळी विशेष शिक्षिका ज्योत्स्ना डेरे यांनीही मनोगतात अंध विध्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीबद्दल प्रात्याक्षिक दाखविले.

काटदरे म्हणाले, “देणं हे खरं दान आहे, जेव्हा ते योग्य माणसापर्यंत पोहोचतं.” आज आम्ही दिलेली मदत सर्वोत्तम ठिकाणी दिली जात असलेने यापुढेही हा ओघ असाच सुरु राहील.
प्रमुख पाहुणे डॉ.अरविंद काळे म्हणाले, “आनंदाश्रम नेहमीच अशा समाजोपयोगी कामाच्या पाठीशी राहील. दिव्यांग मुलांनी खचून न जाता स्वावलंबी व्हावं.”

सर्व लाभार्थ्यांनी “आम्ही स्वावलंबी होऊ, दुसऱ्यांना मदत करू” असा संकल्प केला.
सौ.सुषमा कारंजकर यांनी सर्व दिव्यांग मित्र मैत्रिणींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौ.अपर्णा बोकील यांनी सर्व देणगीदार, लाभार्थी, डॉ.काळे यांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सक्षम सचिव श्री.आनंद मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
सक्षम पदाधिकारी साईप्रसाद कुलकर्णी, दिपक वाळिंबे, चंद्रकांत घाडगे, शाहबुद्दीन शेख, प्रशांत तरडे, वीणा तरडे, स्नेहलता वझे, विष्णू बोकील, नरेन शिवदे, अविनाश कुलकर्णी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!