‘चिंतन आणि अभ्यासाचा आधार असल्यास चित्रपट विषयक साहित्य टिकेल’
पुणे पुस्तक जत्रेतील परिसंवादात मान्यवरांचे मत
पुणे : केवळ मनोरंजनासाठी उथळपणे चित्रपटविषयक साहित्य लिहिले गेल्यास ते तात्कालीक ठरेल, चिंतन करूनच या कलेविषयी लिहिले जावे आणि तरच ते काळाच्या कसोटीवर टिकेल,असा सूर ‘चित्रपट विषयक साहित्य टिकाऊ आहे का?’ या परिसंवादात उमटला.
पुणे बुक फेअरमध्ये झालेल्या या परिसंवादात कृपाशंकर शर्मा, प्रभाकर खोले, स्वप्निल पोरे, श्रीपाद ब्रह्मे, मुकुंद फडके आणि धनंजय कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.
चित्रपट माध्यमाच्या शक्तीची जाण ठेऊन, त्या बरोबरीने समाजीक व सांस्कृतिक भान राखून केलेले चित्रपटविषयक लेखन येणाऱ्या काळात निश्चितपणे टिकून राहील, असे मत कृपाशंकर शर्मा यांनी व्यक्त केले.
पाश्चात्य देशात ज्या पद्धतीने चित्रपट माध्यमावर दर्जेदार पुस्तके निघतात तशी भारतात निघत नाही हे कटू सत्य आहे, असे मत प्रभाकर खोले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आपल्याकडील अनेक कलावंतांनी आत्मचरित्र लिहिलीच नाहीत, त्यामुळे त्या काळाचा त्या कलावंताशी असलेला ‘कनेक्ट’ आपण गमावून बसलो !
त्या-त्या पिढीतील लेखकांनी चित्रपट माध्यमांशी संबंधित कलाकारांना बोलते करुन त्यांच्या आठवणी समाजासमोर आणल्या पाहिजेत असे मत स्वप्निल पोरे यांनी व्यक्त केले. यातून संदर्भमूल्य असलेले साहित्य निर्माण होईल, असे ते म्हणाले.
श्रीपाद ब्रह्मे म्हणाले, चित्रपट विषयक लिखाणात पुरेसे गांभीर्य असावे. चिंतनाची बैठक असलेले चित्रपटविषयक साहित्य दीर्घकाळ टिकून राहील.
मुकुंद फडके म्हणाले, चित्रपट समीक्षा किंवा परीक्षण हे विषय त्या काळापुरते असतात. पण कलाकारांची चरित्रे, आत्मचरित्र,विशेष मुलाखती यांना मात्र टिकाऊपणा असतो. कारण त्यांच्याकडे संदर्भमूल्यही असते.आधुनिक काळात डिजिटल माध्यमांचा वापर करून चित्रपट विषयक साहित्य टिकवायला हवे.
बदलत्या काळानुसार माध्यम देखील बदलत आहेत, याकडे धनंजय कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, डिजिटल आणि सोशल मीडिया आता महत्त्वाचा ठरत असून लेखकांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे.
प्रारंभीज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुणे बुक फेअरचे संयोजक पीएनआर राजन यांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार झाला. समन्वयक शिरीष चिटणीस यांनी आभार मानले.
परिसंवादाचे सूत्र संचालन स्वप्नील पोरे यांनी केले.

