संस्कार भारतीच्या कथाकथन स्पर्धेत अमितकुमार शेलार विजयी
पुणे येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड
सातारा
संस्कार भारतीच्या सातारा जिल्हा समितीने आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेमध्ये अमितकुमार शेलार यांनी विजेतेपद मिळवले.त्यांची पुणे येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शाहू हॉलमध्ये झालेल्या या कथाकथन स्पर्धेमध्ये सुधाकर माने यांनी द्वितीय, साईशा केसकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या व्यतिरिक्त ईशान केसकर आणि मुग्धा देशपांडे यांना उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शेखर कुलकर्णी आणि नरेंद्र आमले यांनी काम पाहिले.
ज्येष्ठ मराठी साहित्यिक शंकर पाटील, द मा मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून संस्कारभारतीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा बांधकाम व्यावसायिक शिवराज ढाणे उपस्थित होते. संस्कार भारतीच्या या उपक्रमाचे दोघांनीही आपल्या भाषणामध्ये कौतुक केले .मराठी साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी असे उपक्रम गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर संस्कार भारतीच्या सातारा जिल्हा समितीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर,सचिव प्रदीप इनामदार, महामंत्री प्रशांत कुलकर्णी, कोषाध्यक्ष अभय पटवर्धन आणि दोन्ही परीक्षक उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेला प्रारंभ झाला .संस्कार भारतीचे ध्येय गीत सादर करण्यात आले.प्रास्ताविक दिलीप चरेगावकर यांनी केले.
परीक्षक शेखर कुलकर्णी यांनी कथाकथन स्पर्धेचा
आढावा घेताना अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने घेण्याच्या गरजेवर भर दिला. कथाकथन हा दुर्लक्षित कलाप्रकार असून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या ठरतील असे त्यांनी सांगितले. दुसरे परीक्षक नरेंद्र आमले यांनी कथा सादर करताना भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असल्याचे सांगितले. कथाकथन करताना स्पर्धकाने श्रोत्यांना नवरसाचा अनुभव द्यायला हवा. साहित्यिक भाषा वापरण्यापेक्षाही बोलीभाषेचा वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कथाकथन स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक स्पर्धकांनी शंकर पाटील यांच्या ग्रामीण कथा सादर केल्या. द मा मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथांनाही श्रोत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. संस्कार भारतीच्या नाट्यविधा प्रमुख रसिका केसकर यांनी सर्व स्पर्धेचे नियोजन केले. त्यांना वर्षा साबडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार भारतीचे प्रचार प्रमुख मुकुंद फडके यांनी केले.आभार प्रदर्शन वर्षा साबडे यांनी केले. कार्यक्रमाला संस्कार भारतीचे सहसचिव संजीव आरेकर, प्रांत सदस्य मधुसूदन पत्की,कोषप्रमुख केशव कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ
कथाकथन स्पर्धेच्या विजेत्यांसोबत संस्कार भारतीच्या सानिका केसकर, रसिका केसकर, मुकुंद फडके, प्रदीप इनामदार, नरेंद्र आमले,मधुसूदन पतकी, दिलीप चरेगावकर, शिवराज ढाणे शेखर कुलकर्णी,संजीव आरेकर वर्षा साबडे

