गायिकांनी लेखन, वाचनातूनही व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे : शिरीष चिटणीस
मिळून साऱ्याजणी’च्या लेडीज स्पेशल गीतसंध्येत हिंदी-मराठी गीतांचा सुरेल नजराणा
सातारा,
गायिकांनी केवळ इतरांची गाणी सादर करण्यापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता, स्वतःच्या कविता लिहाव्यात, लेखन करावे तसेच सातत्याने वाचनाची सवय जोपासून आपल्या विचारांना आणि व्यक्तिमत्त्वाला व्यापकता द्यावी. लेखन व वाचनातून आत्मविश्वास वाढतो आणि कलाकार म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता येते, असे प्रतिपादन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांच्या वतीने ‘मिळून साऱ्याजणी भाग दुसरा’ या लेडीज स्पेशल कार्यक्रमांतर्गत ‘दिल जो ना कह सका’ या संकल्पनेवर आधारित हिंदी-मराठी गीतांचा सुरेल नजराणा दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, येथे रंगला. या कार्यक्रमात गायिकांनी आपल्या मधुर स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस, विजय साबळे व हृदयनाथ गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन सारिका घोरपडे यांनी केले. मंजुश्री जावळे, स्नेहल चिंचणे , रमिजा सय्यद, धनश्री बागडे, गीता उधाणी, रागिणी शिकलगार व ज्योत्स्ना यांनी हिंदी-मराठी गीतांचे बहारदार सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.
शिरीष चिटणीस म्हणाले, लता मंगेशकर यांच्या जीवनप्रवासातून कलाकारांनी अनेक गोष्टी आत्मसात करण्यासारख्या आहेत. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कलेच्या जोरावर त्यांनी मिळवलेले यश हे प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणादायी आहे. चेहऱ्यावर गंभीर भाव असलेल्या लतादीदींच्या स्वभावात मात्र प्रचंड विनोदबुद्धी आणि खेळकरपणा होता. कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वात हा जिवंतपणा आणि खेळकरपणा कायम असणे आवश्यक आहे.केवळ महिला कलाकारांचा कार्यक्रम असल्यामुळे कलाकारांना अधिक मोकळेपणाने व्यक्त होता येते. या मोकळेपणाचा सकारात्मक परिणाम त्यांच्या सादरीकरणातील विविधता, भावभावना आणि आत्मविश्वासावर दिसून येतो. अशा कार्यक्रमांमुळे महिला कलाकारांना एकमेकींकडून शिकण्याची तसेच आपली कला अधिक प्रभावीपणे सादर करण्याची संधी मिळते.
सूत्रसंचालनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सूत्रसंचालकाच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ कार्यक्रम पुढे नेणे एवढीच सूत्रसंचालनाची भूमिका नसून, विविध माहिती योग्य पद्धतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे आणि स्वतःची गुणवैशिष्ट्ये लोकांसमोर मांडणे, हीदेखील सूत्रसंचालनाची कला आहे.
दरम्यान, ‘मिळून साऱ्याजणी’ या महिला कलाकारांच्या समूहाच्या मार्केटिंगची तसेच पुणे येथे त्यांच्या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे चिटणीस यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे उपस्थित महिला कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
हृदयनाथ गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल शिरीष चिटणीस यांचे आभार मानले. २०१९ मध्ये झालेल्या पहिल्या कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी रमिजा सय्यद आणि जावळे मॅडम यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. विविध संगीत समूहांमध्ये कार्यरत असलेल्या महिला गायिकांना एकाच मंचावर आणण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, सर्व गायिका एकाच व्यासपीठावरून आपल्या सुरांची मैफल सजविणार असल्याने रसिकांसाठी ही संगीताची अनोखी पर्वणी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रमिजा सय्यद यांनी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल शिरीष चिटणीस यांचे आभार मानले. मिळालेले हे मैत्रीचे आणि सहकार्याचे नाते भविष्यातही असेच दृढ राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चिटणीस यांनी केलेल्या सूचनेचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, केवळ गायनावर न थांबता लेखन, कविता आणि नव्या संकल्पनांकडेही आता वळण्याचा प्रयत्न करू. गेल्या वर्षी ‘मिळून साऱ्याजणी’च्या कार्यक्रमाचा पहिला भाग सादर करण्यात आला होता. यंदा त्याचा दुसरा भाग आयोजित करण्यात आला असून, हा संगीतमय प्रवास यापुढेही अखंड सुरू ठेवत रसिकांना सुरेल आनंद देत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

