हिंदी-मराठी गीतांना शास्त्रीय संगीताचा पाया : शिरीष चिटणीस


 

सातारा
चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्र समृद्ध करण्यात मराठी माणसांसह अनेक गुणी कलावंतांनी मोठी उभारी दिली आहे. संगीत नाटकांच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत आणि रागदारीची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. आजच्या हिंदी गाण्यांमध्ये आणि आधुनिक चित्रपट संगीतातही शास्त्रीय रागांचा पाया असल्याचे प्रतिपादन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले.

Advertisement

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा व रंगोली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी व मराठी गीतांची सुश्राव्य मैफिल सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ, सातारा येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी चिटणीस बोलत होते.
चिटणीस म्हणाले, संगीत नाटकांची परंपरा ही महाराष्ट्रासह जगाला मिळालेली मोठी देणगी आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून संगीत नाटकांना रसिकांची मोठी पसंती मिळाली. नाट्यगीतांच्या माध्यमातून अगदी ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शास्त्रीय रागांची ओळख पोहोचली. त्यामुळे सामान्य रसिकही विविध राग ओळखू लागला, हे मराठी रंगभूमीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आजच्या हिंदी चित्रपटांतील गाणी तसेच आधुनिक चित्रपट संगीतातही प्रामुख्याने शास्त्रीय संगीत आणि रागदारीचा आधार पाहायला मिळतो.
अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विविध क्षेत्रांतील गुणी कलावंतांना एकत्र येण्याची आणि आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याची संधी मिळते. कलाकारांनी भविष्यात केवळ प्रचलित गाणी सादर न करता स्वतः गाणी रचून स्वतंत्र कार्यक्रम सादर करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर प्रत्येकाने वाचनाकडे वळून वाचनाची सवय वाढविली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
शाळेतील लहान मुलांना बडबडगीते तसेच संगीताचे शिक्षण देणाऱ्या उज्ज्वला कर्णवर, शीतल मोरे, नयना जाधव आणि रोहिणी स्वामी यांचा चिटणीस यांनी विशेष उल्लेख करून स्वागत केले. या उपक्रमाचा लवकरात लवकर २५ वा रौप्य महोत्सवी कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात उज्ज्वला कर्णवर, शीतल मोरे, नयना जाधव आणि रोहिणी स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सुरेश सर, हेमंत सर, केतन सर, दुर्गा मॅडम, शुभांगी मॅडम आणि साक्षी मॅडम यांनी गीतांचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित मान्यवर व सर्व कलावंतांचे स्वागत करून कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना रंगोली ग्रुपची, तर सुसंवाद रंगोली टीमचा होता. ध्वनी व्यवस्था लोंढे सर यांनी पाहिली. हिंदी व मराठी गीतांच्या सुरेल सादरीकरणामुळे दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये संगीतप्रेमी रसिकांना संस्मरणीय सांगीतिक अनुभव मिळाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!