लेखनाला असते वैयक्तिक अनुभवाची किनार:योगेश सोमण




संस्कार भारतीतर्फे कथालेखन, कथाकथन कार्यशाळा संपन्न
सातारा
कथालेखन. कादंबरी लेखन किंवा इतर कोणतेही लेखन करत असताना त्याला आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांची आणि वैयक्तिक अनुभवाची किनार असते असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष व संस्कार भारतीचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिग्दर्शक योगेश सोमण यांनी केले.
संस्कार भारती सातारा जिल्हा समितीतर्फे येथील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये कथालेखन व कथाकथन कार्यशाळा कथाकथी २६ आयोजित करण्यात आली होती तेव्हा ते बोलत होते.
योगेश सोमण पुढे म्हणाले, कथा कविता किंवा इतर कोणत्या प्रकारचे लेखन करणे सोपे नाही. त्याला आपल्या आयुष्यात आलेल्या वैयक्तिक अनुभवांची जोड द्यावी लागतेच. शिवाय काही प्रमाणात या लिखाणामध्ये सत्य सुद्धा उतरवावे लागते. तेव्हाच ते लेखन वाचकांच्या हृदयापर्यंत जाऊ शकते.
योगेश सोमण यांनी या कार्यशाळेमध्ये उपस्थित सहभागीकडून अनेक प्रकारचे कार्यप्रयोग करून घेतले.कथाकथनाच्या दृष्टीने आवश्यक अशा अनेक मुद्यांवर प्रात्यक्षिकासह चर्चा केली.वेळेचे नियोजन, देहबोली,चेह-यावरील आत्मविश्वास,प्रेक्षकांशी संवाद साधणे, स्वतःच्या आवाजाचा व्यायाम,विविध कथांचे वाचन करुन योग्य कथा कशी निवडावी,कथेचे भागश: पाठांतर करणे व नियमित तालीम करणे अशा विविध पैलूंचे महत्व त्यांनी विषद केले.सहभागी प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या शंकांचे समाधानकारक निरसन केल्यामुळे कथाकथन आणि अभिवाचन यातील फरक समजून घेणे प्रशिक्षणार्थींना शक्य झाले.
शंकर पाटील, द मा मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर या तीन प्रमुख लेखकांची जन्मशताब्दी सुरू असल्याने त्या निमित्ताने संस्कार भारतीतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्कार भारती सातारा जिल्हा समितीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर, सचिव प्रदीप इनामदार प्रांताचे प्रसिद्धी व प्रचार प्रमुख रुपेश कुंभार, साहित्य विधा प्रमुख मधुसूदन पत्की उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार भारती सातारा जिल्हा समितीच्या नाट्यविधा प्रमुख रसिका केसकर यांनी केले.रुपेश कुंभार आणि मधुसूदन पत्की यांचा सत्कार संस्कार भारतीचे सातारा जिल्हा समिती उपाध्यक्ष संजय दीक्षित यांनी केला. योगेश सोमण यांचा सत्कार दिलीप चरेगावकर यांनी केला. संस्कार भारती तर्फे लवकरच कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आले. सचिव प्रदीप इनामदार यांनी या कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैष्णवी आरेकर हिने संस्कार भारतीचे ध्येयगीत सादर केले. तिचा सत्कार योगेश सोमण यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार भारतीचे प्रचार प्रमुख मुकुंद फडके यांनी केले. आभार प्रदर्शन सहसचिव संजीव आरेकर यांनी केले. या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, सातारा जिल्ह्यातील विविध भागातून आलेले लेखक आणि संस्कार भारतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कु ऋतुजा देवी व सौ उज्वला देवी ह्यांनी रेखाटलेली संस्कारभारतीची आकर्षक रांगोळी कार्यक्रम स्थळी लक्ष वेधित होती.
फोटो ओळ
योगेश सोमण यांचा सत्कार करताना दिलीप चरेगावकर,शेजारी मुकुंद फडके,मधुसूदन पत्की,प्रदीप इनामदार,रुपेश कुंभार,संजीव आरेकर

