वैचारिक शस्त्र घेऊन पर्याय देण्यासाठी सज्ज व्हा
लोकशाहीर संभाजी भगत यांचे आवाहन
सातारा
आगामी काळात सर्वच प्रागतिक व डाव्या विचाराच्या राजकीय पक्ष संघटनांनी शिव, फुले, शाहू ,आंबेडकर , अण्णाभाऊ साठे यांचे सांस्कृतिक संघर्षाच्या राजकारणाचे वैचारिक शस्त्र हाती घेऊन पर्याय देण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन लोकशाहीर संभाजी भगत यांनी सातारा येथे बोलताना केले.
कामगार नेते व सातारचे पहिले आमदार कॉ ॲड व्ही.एन. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सद्यस्थितीतील सांस्कृतिक संघर्षाचे राजकारण या विषयावर लोकशाहीर संभाजी भगत बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ व्ही.एन. पाटील स्मारक समिती चे कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके होते.
विचारमंचावर स्मारक समिती चे ॲड ताहीर मणेर , विजय निकम ,ॲड वसंतराव नलावडे, प्रमोद परमणे , शंकर पाटील आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहामध्ये संपन्न झाला.
तथागत गौतम बुद्धांनी सांस्कृतिक राजकारणाच्या संघर्षाचा पाया घातला. वारकरी संप्रदायातील संतांनी त्याच्या पुढच्या कालखंडात पुढे जाऊन महत्वाची भूमिका बजावली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुले व त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्याय उभा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांस्कृतिक राजकारण केले आणि तेच राजकारण आपल्याला पुढे न्यायचे आहे. आपण निर्माण करणार्यांच्या संस्कृतीच्या बाजूचे आहोत. ओरबाडणाऱ्या संस्कृतीचे समर्थक नाही असेही संभाजी भगत यांनी सांगितले.
बहुतेक सगळ्या प्रागतिक विचाराच्या राजकीय पक्षांनी सांस्कृतिक राजकारणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच त्याचा फटका त्यांना बसलेला आहे असे सांगून लोकशाहीर संभाजी भगत म्हणाले की काँग्रेसने स्वतःचे सांस्कृतीक राजकारण उभे केले नाही म्हणूनच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच डाव्यांनीही या सांस्कृतीक राजकारणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले नाही. त्याचा फटका त्यांना बसला असेही संभाजी भगत म्हणाले.
बहुजन आणि श्रमण संस्कृतीची मांडणी करणारे नव सांस्कृतिक राजकारण पर्याय म्हणून उभं करावं लागेल आणि यासाठी सर्व डावे पक्ष , संघटना तसेच शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ यांचे विचार मानणारांनी एकत्र यावे असे आवाहन करून विजय मांडके यांनी यासाठी 1952 मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत कॉ दत्ता देशमुख व कॉ व्ही एन पाटील यांनी आपल्या मताचा कोटा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पारड्या मध्ये टाकल्यानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेवर विजयी झाले याचा दाखला दिला. आत्ताच्या काळातही असेच सांस्कृतिक दृष्ट्या सजग राजकारण झाले पाहिजे तरच उजव्या शक्तीला आपण पराभूत करू शकू असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी लोकशाहीर कॉ अण्णाभाऊ साठे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच कॉ व्ही एन.पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी कॉम्रेड व्ही एन पाटील यांचे सहकारी कॉ त्र्यंबक ननावरे कॉ रेखाताई खंडुझोडे , कॉ. शंकर पाटील यांचा संभाजी भगत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक कॉ विजय निकम यांनी केले. स्वागत कॉ प्रमोद परमणे यांनी केले. आभार एडवोकेट वसंतराव नालावडे यांनी मानले.

