वृक्ष रक्षाबंधनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
काशीळ-स्टॅन्ड शाळेत पर्यावरणपूरक उपक्रम
सातारा
रक्षाबंधनाच्या निमित्ताने निसर्गाशी असलेले आपले अतूट नाते अधोरेखित करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काशीळ-स्टॅन्ड येथे विद्यार्थ्यांनी ‘राखी झाडाला… वचन पर्यावरणाला!’ हा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्या झाडांना बांधून ‘वृक्षांचे रक्षण करू, पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारू’ असा संदेश दिला.या उपक्रमास जिल्हा बांधकाम विभागाच्या अभियंता सन्माननीय सौ. स्नेहल सदावर्ते मॅडम तसेच अतीत केंद्राच्या केंद्रप्रमुख सन्माननीय सौ. सुनीता शेडगे मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते झाडाला राखी बांधून विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले.
यावेळी सौ. सुनीता शेडगे मॅडम यांनी ‘एक पेड माँ के नाम’, परसबाग, सीड बॉल्स यांसारख्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शालेय जीवनात अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
सौ. स्नेहल सदावर्ते मॅडम यांनी शाळेत इको-फ्रेंडली वस्तूंचा वापर वाढविणे तसेच पर्यावरण संवर्धन करणाऱ्या विविध शालेय उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक मूल्यांची रुजवणूक करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यावरणविषयक जाणीवा समृद्ध होण्यासाठी अतिशय चांगले आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, असे त्यांनी कौतुकाने नमूद केले.
यावेळी दोन्ही मान्यवरांनी शाळेच्या भौतिक सुविधांची पाहणी व तपासणी करून शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, पर्यावरणपूरक व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून राख्या तयार केल्या होत्या. या स्वनिर्मित राख्या झाडांना बांधत विद्यार्थ्यांनी निसर्गाशी आपला भावनिक बंध अधिक दृढ केला. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण केवळ मानवी नात्यांपुरता मर्यादित न राहता ‘निसर्गरक्षणाची जबाबदारी’ स्वीकारण्याचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.
या अभिनव उपक्रमाचे सातारा तालुक्याच्या उपसभापती सन्माननीय सौ. सुषमाताई जाधव मॅडम, काशीळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अर्चनाताई कोरे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. वसंत माने, श्री. प्रफुल्ल जाधव, पालक व ग्रामस्थ यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांना व शाळेला शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीच्या उपसभापती सुषमा जाधव यांनी देखील या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
‘झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा’ हा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, संवेदनशील आणि संस्कारक्षम अनुभव ठरला.

