शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याची ज्ञानशिदोरी – दिलीप गरुड
सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात; तीन दशकांच्या शैक्षणिक सेवेला मान्यवरांचा सलाम
सातारा
“शिक्षक हा केवळ धडा शिकवणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ असतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ज्ञानाची शिदोरी म्हणजे शिक्षक. लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका ज्योती नलवडे यांनी तब्बल २८ वर्षे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्ये रुजविण्याचे कार्य केले. त्यांनी घडविलेली विद्यार्थी पिढी हेच त्यांच्या कार्याचे जिवंत स्मारक असून त्यांचे संपूर्ण शैक्षणिक जीवन प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार अमरेंद्र भास्कर मराठी साहित्य संस्था, पुणेचे कार्यवाह दिलीप गरुड यांनी काढले.
‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थेच्या लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर, एम.आय.डी.सी., कोडोली, सातारा येथील मुख्याध्यापिका ज्योती प्रकाश नलवडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, साताराचे अध्यक्ष शिरीष चिटणीस होते. प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी धनश्री सातपुते-जाधव उपस्थित होत्या. व्यासपीठावर संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस, संचालक भानुदास साबळे, सागर कांबळे, सतीश पवार, मुख्याध्यापक विजय यादव, कल्याण भोसले, शशिकांत जमदाडे, शांताराम पवार, प्रकाश नलवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
दिलीप गरुड पुढे म्हणाले, “हाडाचा शिक्षक हा विद्यार्थ्यांशिवाय राहू शकत नाही. जशी भाकरी माणसाच्या पोटाची गरज आहे, तशीच विद्यार्थ्यांची ओढ शिक्षकाच्या मनाची गरज असते. शिक्षकाला खरी कमाई वेतनातून मिळत नाही; ती विद्यार्थ्यांच्या यशातून मिळते. नलवडे मॅडम यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देत शिक्षणासोबतच चारित्र्य, शिस्त आणि सामाजिक मूल्यांचीही जोपासना केली. आज विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कार्याचे प्रतिबिंब दिसून येते.”
अध्यक्षीय समारोपात शिरीष चिटणीस म्हणाले, “शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याची विलक्षण क्षमता नलवडे मॅडम यांच्याकडे आहे. गेल्या जवळपास तीन दशकांत त्यांनी सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना घडविले. आज हे विद्यार्थी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. हीच त्यांच्या सेवेला मिळालेली सर्वोच्च पावती आहे.”
प्रमुख पाहुण्या धनश्री सातपुते-जाधव यांनी विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा देताना सांगितले, “नलवडे मॅडम आम्हाला प्रेमाने शिकवत असतानाच शिस्तीचे धडेही देत असत. शिक्षकांचे प्रेम आणि संस्कार आयुष्यभर साथ देतात. मजबूत इमारतीसाठी जसा भक्कम पाया आवश्यक असतो, तसाच आमच्या आयुष्याचा पाया त्यांनी घातला. माझ्या यशामागे त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मोलाचे आहेत.”
संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस म्हणाल्या, “ज्योती नलवडे यांचा स्वभाव अत्यंत नम्र, संयमी आणि विद्यार्थ्यांवर ममत्वाने प्रेम करणारा आहे.त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण केली. त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांचा अनुभव समाजासाठी मार्गदर्शक ठरेल.”
मुख्याध्यापक विजय यादव यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “शाळा ही विद्यार्थ्यांचे मन, मनगट आणि मेंदू घडविणारी प्रयोगशाळा आहे. नलवडे मॅडम यांनी २८ वर्षे अहोरात्र परिश्रम घेऊन शाळेच्या गुणवत्ता वृद्धीत मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या कार्यामुळे शाळेची सामाजिक प्रतिष्ठा अधिक उंचावली.”
सागर कांबळे म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि जिद्द निर्माण करण्याचे कार्य नलवडे मॅडम यांनी सातत्याने केले. आयुष्यभर कमावलेली माणसे ही कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असतात. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात त्यांनी निर्माण केलेले स्थान हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे.”
प्रकाश नलवडे यांनी संस्थेतील शिक्षक, कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे योगदान अधोरेखित करताना सांगितले की, “सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून शाळा उत्कृष्टतेच्या शिखरावर पोहोचली असून या प्रवासात प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्त्वाचे आहे.”
ज्ञानेश्वर मोहटकर यांनी ज्योती नलवडे यांचा उल्लेख “मातृहृदयी शिक्षिका” असा करत त्यांच्या विद्यार्थीप्रेमाचा आणि पालकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा गौरव केला. संदीप जाधव यांनी शाळेचे वातावरण आनंदी, सकारात्मक आणि विद्यार्थीकेंद्री ठेवण्यात त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
सत्काराला उत्तर देताना ज्योती नलवडे भावुक होत म्हणाल्या, “या विद्यालयाशी माझे अतूट भावनिक नाते आहे. माझ्या घरातील पंधरा मुले याच शाळेत शिकली आहेत. या विद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाले, हेच माझ्या आयुष्यभराच्या सेवाकार्याचे खरे फलित आहे. गेले २८ वर्षांचा प्रवास संस्था, सहकारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्यामुळे अत्यंत आनंददायी ठरला. या प्रेमाची आणि आपुलकीची आठवण मी आयुष्यभर जपून ठेवेन.”
यावेळी ज्योती नलवडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी, पालक आणि सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
या कार्यक्रमास गुलाब पठाण, यू. जी. जाधव, काकासो निकम, बाळकृष्ण इंगळे, वैशाली वाडीले, प्रतिभा वाघमोडे, सुजाता शिंदे, चंद्रकांत देवगड यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कल्याण भोसले यांनी केले. सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले, तर हणमंत खुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

