रागाच्या भरात आईलाच संपवलं
पत्नीशी फोनवर बोलत असताना आई मध्येच बोलल्याने संताप
कोल्हापूर
एखाद्याला राग आला आणि तो डोक्यात गेला तर ती व्यक्ती काय करेल याचा काहीच नेम नाही.अशाच रागामुळे एका मुलाने आपल्या आईलाच संपवलं आणि त्याचं आयुष्यही उद्ध्वस्त झालं. रागातून मुलाने जन्मदात्या आईचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्राकर कोल्हापूरमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. पत्नीशी मोबाईलवर बोलताना आई मध्येच बोलल्याचा मुलाला राग आला आणि त्याने आईचाच जीव घेतला.
ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या साळोखे पार्क येथे घडली. सादिक मुजावर असे आरोपीचे नाव असून शहनाज मुजावर असे मृत महिलेचे नाव आहे. सादिक मुजावर याचे याचे त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत अनेक वाद होते. त्यामुळे कोल्हापूर पोलिस स्थानकात त्याच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत. आई आणि बहिणीसोबत देखील अनेक वेळा त्याचे वाद झाले.काल रात्री सादिक हा त्याच्या पत्नीसोबत बोलत होता. तेवढ्यात त्याची आई, शहनाज ही मध्येच काहीतरी बोलली. पत्नीसोबत बोलत असताना आई मध्येच बोलल्याने सादिक तिच्याशी वाद घालू लागला. माझ्या पत्नीशी मी बोलत असताना तू मघ्येच का बोलली? असा जाब विचारत तो आईशी भांडू लागला. हे भांडण इतकं टोकाला गेलं की संतापलेल्या सादिकने आईवर सुऱ्याने थेट हल्ला केला. वादात सादिकने बेसावध असलेल्या आईच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर सुऱ्याने वार केले.
गंभीर जखमी झालेल्या त्याच्या आईचा प्रचंड रक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यू झाला. या हत्याकांडाची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून शहनाज यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी सादिक याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
