सुर, ताल आणि भाव यांची शिस्त पाळणे आवश्यक —डॉ. सारिका देशपांडे
सदाबहार नगमे भाग ९४’ कार्यक्रमात संगीतप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांच्या वतीने आयोजित ‘सूरसंगम वर्ष चौथे – सदाबहार नगमे भाग ९४’ हा सुरेल सांगीतिक कार्यक्रम शनिवार पेठ येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सुरेल गीतांच्या बहारदार सादरीकरणाबरोबरच संगीताचे सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित करणाऱ्या मान्यवरांच्या विचारांनी कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वर्षा बेगमपुरे,वसंत जोशी, काका पाटील, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस, किरण आडागळे, डॉ. सारिका देशपांडे, शहाबुद्दीन शेख,युनूस शेख,मनोज तपासे,धनराज शिंदे आणि राजेश वंजारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात यशेंद्र क्षीरसागर, मीना गोंदकर, सुनील धनावडे, साधना धनावडे, नासिर पालकर, शरीफ सलाते, बडे भाई आणि युनूस भाई या कलाकारांनी अजरामर हिंदी-मराठी गीतांचे दर्जेदार सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. प्रत्येक गीताला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती.
कन्या शाळेच्या माजी शिक्षिका वर्षा श्याम बेगमपुरे म्हणाल्या….संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.संगीत ऐकत वाचन करणे हे ज्येष्ठ नागरिकाना आनंददायी वातावरण निर्माण करून जगण्याची उमेद वाढवते.भारतीय संगीताची हजारो वर्षांची परंपरा संपूर्ण जगासाठी आदर्शवत असून योगविद्ये एव्हडेच याला जगभर महत्व आहे.मला वेळ मिळेल तेंव्हा मी दीपलक्ष्मी हॉल मधील कराओके कार्यक्रमात रसिक म्हणून सहभागी होते.
प्रमुख पाहुण्या डॉ. सारिका देशपांडे यांनी आपल्या मनोगतात संगीत सादरीकरणातील शिस्त आणि तयारीचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “कितीही आकर्षक संगीत असले तरी ताल आणि सुरांवर प्रभुत्व नसेल तर गाण्याची परिणामकारकता कमी होते. लोकप्रिय आणि अजरामर गीते सादर करताना गायकाची जबाबदारी अधिक वाढते. ही गीते श्रोत्यांच्या मनात, स्मरणात आणि काळजात कायमची घर करून बसलेली असतात. त्यामुळे त्यातील छोटासा फरकही जाणकार श्रोत्यांच्या लक्षात येतो.”
त्या पुढे म्हणाल्या, “अनेक श्रोते हे ‘कानसेन’ असतात. ते गाणे ऐकत असतानाच मनातल्या मनात ते गुणगुणत असतात. त्यामुळे कलाकाराने जे गीत सादर करायचे आहे, ते त्याच्या मनापासून आवडलेले, अनेकदा ऐकलेले आणि आत्मसात केलेले असणे आवश्यक आहे. केवळ कोणाच्या आग्रहाखातर किंवा फर्माईशीवर गायलेले गीत तितक्या प्रभावीपणे सादर होत नाही.”
यावेळी बोलताना शिरीष चिटणीस म्हणाले, “दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्यासपीठ नसून चित्रकार, शिल्पकार, गायक, साहित्यिक आणि विविध कलावंतांच्या गुणांचे कौतुक करणारे प्रेरणादायी केंद्र बनत आहे. कला जपण्याबरोबरच कलाकारांना समाजासमोर आणण्याचे काम या हॉलमधून सातत्याने होत आहे.”
ते पुढे म्हणाले, “कराओके हे केवळ गाण्याचे माध्यम नसून लोकांना एकत्र आणणारे प्रभावी सांस्कृतिक साधन आहे. भारतापुरते मर्यादित न राहता चीन, अमेरिका, इंग्लंडसारख्या आणि इतर देशांमध्येही कराओकेच्या माध्यमातून लोक आनंद, मैत्री आणि मानसिक समाधान अनुभवतात. धकाधकीच्या जीवनातील ताण-तणाव दूर करून संगीताच्या माध्यमातून अध्यात्माकडे वाटचाल करण्याची ताकद कराओकेमध्ये आहे. गाणे हे केवळ मनोरंजनासाठी नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे.” या प्रसंगी मूर्तिकार धनराज शिंदे याचा सत्कार वसंत जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच गायक किरण अडागळे यांचा सत्कार वर्षा बेगमपुरे यांच्या हस्ते करण्यात आला.

