कठोर परिश्रमामुळेच भारतीय सैन्यात यश मिळते – अजित बागल
लोकमंगल हायस्कूल येथे गौरव; विद्यार्थ्यांना सैन्यभरतीचे मार्गदर्शन
सातारा
देशसेवा ही केवळ नोकरी नसून ती राष्ट्राप्रती असलेली सर्वोच्च बांधिलकी आहे. जीवनात निश्चित ध्येय, अखंड परिश्रम आणि संघर्षाची तयारी असेल, तर भारतीय सैन्यात यशस्वीपणे प्रवेश मिळविणे शक्य आहे, असा प्रेरणादायी संदेश भारतीय सेनेतील जवान अजित सदाशिव बागल यांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थेच्या लोकमंगल हायस्कूल, नागेवाडी-कुशी (ता. जि. सातारा) येथे भारतीय सेनेतील विशेष कामगिरीबद्दल अजित बागल यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त सैनिक जनार्दन सावंत यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सत्काराला उत्तर देताना अजित बागल यांनी आपल्या सैन्य प्रवासाचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. ते म्हणाले, “मी सन २०१८ मध्ये भारतीय सेनेत रुजू झालो. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर प्रथम मनात स्पष्ट ध्येय असणे आवश्यक आहे. ध्येयाशिवाय शिक्षणालाही दिशा मिळत नाही. संघर्षाशिवाय यश प्राप्त होत नाही. विशेषतः १९ ते २१ या वयोगटात सातत्यपूर्ण प्रयत्न, नियमित सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर भारतीय सैन्यात भरती होणे निश्चित शक्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आजपासूनच आपल्या भविष्याचे ध्येय निश्चित करून त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.”
यावेळी मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त सैनिक जनार्दन सावंत म्हणाले, “भारतीय सैन्य, हवाई दल किंवा अन्य संरक्षण दलात प्रवेश मिळविण्यासाठी केवळ इच्छा पुरेशी नसून त्यामागे ध्येय, शिस्त आणि योग्य तयारी आवश्यक आहे. बारावीनंतर एअर फोर्समध्ये प्रवेशाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. जनरल नॉलेज, शारीरिक क्षमता आणि अभ्यास यांचा योग्य समन्वय साधला, तर एनडीएसारख्या प्रतिष्ठित परीक्षेतही यश मिळविता येते. दहावीमध्ये चांगले गुण मिळवून विद्यार्थ्यांनी आतापासूनच सैन्यभरतीची तयारी सुरू केली, तर त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच यश मिळेल.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात शिरीष चिटणीस म्हणाले, “विद्यार्थ्यांसमोर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणण्यामागचा उद्देश हा त्यांच्या मनात मोठी स्वप्ने आणि उंच ध्येय निर्माण करणे हा आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतात. त्याचबरोबर ग्रंथालयातील पुस्तकांचे नियमित वाचन विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला समृद्ध करून त्यांच्या ध्येयाला बळकटी देते. अजित सदाशिव बागल यांनी भारतीय सैन्यात उल्लेखनीय कार्य करून सातारा जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्वतःच्या आयुष्याला योग्य दिशा द्यावी.”
पुढे बोलताना त्यांनी आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, “पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि मानसिक आधार अधिक होता. मात्र विभक्त कुटुंब पद्धती वाढत असल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होताना दिसते. अशा परिस्थितीत चांगले वाचन, सकारात्मक विचार आणि प्रेरणादायी व्यक्तींचा सहवास विद्यार्थ्यांना मानसिक बळ देण्याचे महत्त्वाचे कार्य करतो.”
या कार्यक्रमास मुख्याध्यापक शशिकांत जमदाडे, नितीनकुमार कसबे, प्रियंका शिंदे, बाळकृष्ण इंगळे, हणमंत खुडे, राहुल घोडके, रमेश महामुलकर, दत्तात्रय शिर्के यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक शशिकांत जमदाडे यांनी केले, तर आभार संगीता कुंभार यांनी मानले

