पाठकजी कुटुंबीयांकडे यंदा रंगावलीतील मंगलमूर्ती


सलग ११ व्या वर्षी वेगळ्या सजावटीचा उपक्रम

सातारा
‘ज्ञानगणेश’, ‘संगीत गणेश’, ‘क्रीडा गणेश’, ‘अर्थ गणेश’, ‘श्रीराम गणेश’, ‘काव्य-चित्र गणेश’ अशा संकल्पनांवर आधारित असलेल्या घरगुती गणेशासमोरील सजावटीनंतर सलग ११ व्या वर्षी पद्माकर पाठकजी कुटुंबियांनी यंदा साताऱ्याच्या यादोगोपाळ पेठेतील ‘अमृतवेल’ येथील घरी ‘रंगावली गणेश’ ही सजावट साकारली आहे.
रांगोळी म्हणजे केवळ शुभकार्याची सजावट नव्हे; तर ती भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य भाग आहे. शुभत्व, मांगल्य आणि सौंदर्य यांची सांगड घालत अनेक शतके, पिढ्यान्‌पिढ्या घराच्या दारात रांगोळी उमटत आली. यंदाच्या गणेशोत्सवात याच पारंपरिक कलेला मध्यवर्ती स्थान देऊन ही आरास साकारली. रांगोळीची परंपरा प्राचीन आहे. महाराष्ट्रात ती ‘रांगोळी’, दक्षिण भारतात ‘कोलम’, बंगालमध्ये ‘अल्पना’, राजस्थानात ‘मांडणा’, तर बिहारमध्ये ‘अरीपना’ अशा विविध नावांनी आणि विविध शैलींमध्ये ती आढळते. रांगोळीचा हा सारा इतिहास या निमित्ताने शोधता आला आणि तो सजावटीसाठी वापरला. (यासाठी ‘साप्ताहिक विवेक’च्या विशेषांकाची खूप मदत झाली.) ठिपके, रेषा, भूमितीय आकार, फुलांची नक्षी, पक्षी-प्राणी, पारंपरिक प्रतीके आणि मुक्तहस्त रेखाटन अशा असंख्य रूपांत रांगोळीचे प्रचंड मोठे विश्व विस्तारले आहे. या विश्वातील प्रातिनिधिक स्वरूपाच्या रांगोळ्या गणेशासमोर साकारल्या आहेत.

Advertisement

रांगोळ्यांचे प्रकार
ठिपक्यांची रांगोळी, गालिचा, कोलम, वारली रांगोळी, संस्कार भारती रांगोळी, धान्य आणि डाळींची रांगोळी, तांदळाची रांगोळी, चैत्रांगण, फुलांची रांगोळी, पाण्यावरची रांगोळी, मॅटवरील रांगोळी असे रांगोळीचे प्रकार गणेशासमोर साकारले आहेत. यातील बहुतांश रांगोळ्या सौ. भाग्यश्री पाठकजी यांनी स्वतः काढल्या, तर साताऱ्यातील माधव खोले यांनी गालीचा, महेश जाधव यांनी संस्कार भारती रांगोळी साकारली. पुण्याच्या सुरुची वाघ यांनी मॅटवरील रांगोळी तयार करून दिली. तसेच अक्षय चिकलगे याने ‘डीटीपी’साठी साह्य केले. या साऱ्यांच्या प्रयत्नांतून हा ‘रंगावली गणेश’ साकारला. फुलांची रांगोळीही रोज किंवा दिवसाआड करण्याचा विचार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे मूळ रूप दिवसेंदिवस बीभत्स आणि कर्कश होत असताना त्यातील सात्विकता, वैविध्य जपण्याचा आमचा हा छोटासा घरगुती प्रयत्न गणरायाच्या आशीर्वादाने आणि त्याने दिलेल्या प्रेरणेनेच साकारला. रंगांनी सजलेले हे गणेशासमोरचे ‘अंगण’ पाहण्यासाठी सर्वानी यावे असे आवाहन पद्माकर पाठकजी, जयदीप पाठकजी आणि कुटुंबीय यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!