कला जोपासल्यामुळे आयुष्य समृद्ध होते
स्वरआशा संगीत कार्यक्रमामध्ये वैशाली पारसनीस यांचे प्रतिपादन
सातारा
आपले दैनंदिन आयुष्य जगतानाही एखादी कला जोपासली तर हे आयुष्य समृद्ध होऊन जाते असे प्रतिपादन वैशाली पारसनीस यांनी केले. येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये दीपलक्ष्मी पतसंस्था व सुहाना सफर सिंगर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या स्वरआशा या हिंदी व मराठी गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या
वैशाली पारसनीस पुढे म्हणाल्या. दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला व्यावहारिक आयुष्य जगावेच लागते. पण ह्या आयुष्याला जर आपण कलेची जोड दिली तर आयुष्याच्या उत्तर काळामध्ये आपले आयुष्य जास्त समृद्ध होऊन जाते. नृत्यकला, गायनकला, चित्रकला अशा अनेक प्रकारच्या कला उपलब्ध असून प्रत्येकाने एखाद्या कलेची जोपासना करायलाच हवी
दीपलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस म्हणाले, विविध प्रकारच्या कलांना व्यासपीठ देण्यासाठीच आमचे हे सभागृह आम्ही उपलब्ध करून देतो, विविध प्रकारचे साहित्यिक, सांगीतिक, सांस्कृतिक कार्यक्रम या सभागृहामध्ये मोफत सादर केले जातात.त्यामुळे नवीन कलाकारांना संधी मिळते
विजय साबळे यांची निर्मिती आणि संकल्पना असलेल्या या कार्यक्रमामध्ये सुनील पटवर्धन, सचिन शेरकर, चंद्रशेखर बोकील, मिलिंद हर्षे, मंजुषा पोतनीस,ममता नरहरी, स्मिता शेरकर, रेवती बंड, चंद्रकला छंद, दिपाली घाडगे, श्रुती बेंद्रे, सुनीता किर्दत, सुवर्णा लखापती, स्वरांगी शेवडे या गायक कलाकारांनी आशा भोसले यांनी म्हटलेली विविध गाणी सादर केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड स्नेहल कुलकर्णी यांनी केले.
ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे यांनी सांभाळली.

