प्रयोगशील शासकीय कामाबद्दल यशेंद्र क्षीरसागर यांचा सत्कार
सातारा
रोजच्या शासकीय आणि प्रशासकीय कामकाजामध्ये अधिक अर्थपूर्णता आणि सुसूत्रता यावी तसेच हे कामकाज आनंददायी व्हावे म्हणून कामांमध्ये उपक्रमशीलता आणि प्रयोगशीलता यांचा उत्कृष्टपणे अवलंब केल्याबद्दल खटाव पंचायत समितीच्या अंगणवाडी विभागाचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांचा सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण सभापती ऋतुजाताई शिंदे , जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे,गटविकास अधिकारी योगेश कदम, बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता खाबडे, पर्यवेक्षिका , तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या. पुसेगाव येथील सेवागिरी मंदिरातील सभागृहामध्ये “पोषण पंधरवडा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा सत्कार करण्यात आला. श्री.क्षीरसागर यांनी अंगणवाडी विभागात कामकाज करत असताना अंगणवाडी सेविका, मदतनीस,पर्यवेक्षिका तसेच पंचायत समितीचे सर्व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत आणि राबवित आहेत. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर लेखन करून ते प्रसारित करीत आहेत. शासकीय योजनांचा काव्य तसेच लेखनातून प्रसार करीत आहेत.त्यातून कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या दरम्यान निबंध स्पर्धा आणि कविता लेखन स्पर्धा घेण्यात आल्या आणि विजेत्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना “स्कंदमाता लेखन पुरस्कार” प्रदान करण्यात आला.तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये उत्कृष्ट निबंध आणि कविता लिहिणाऱ्या सेविका मदतनीस तसेच पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना “जिजाऊ सावित्री पुरस्कार” प्रदान करण्यात आला. व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे संपूर्ण उपक्रम श्री. क्षीरसागर स्वतःच्या खर्चाने घेत असून कोणतीही प्रवेश फी न घेता केवळ कर्तव्य म्हणून आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून स्वेच्छेने राबवित आहेत. “त्यांचे उपक्रम हे प्रशासनाला बळ देणारे असून त्यामुळे कामकाजामध्ये उत्साह आणि स्फूर्ती जाणवते. त्यांचे कार्य केवळ अभिनंदननीय नसून अनुकरणीय आहे,” अशा भावना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे यांनी व्यक्त केल्या. “पंचायत समितीचे कामकाज अधिक उत्साहीपणे होण्यासाठी उपक्रमशीलता महत्त्वाची आहे. ही उपक्रमशीलता जोपासून श्री. क्षीरसागर यांनी पंचायत समितीचे कामकाज आनंदी बनविण्यामध्ये मोठा हातभार लावला आहे.” असे प्रतिपादन गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्योती देशमुख यांनी आभार मानले.
फोटो ओळ:
प्रयोगशील आणि उपक्रमशील शासकीय कामकाजाबद्दल यशेन्द्र क्षीरसागर यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.प्रियाताई शिंदे. यावेळी महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे तसेच खटावचे गटविकास अधिकारी योगेश कदम.

