माधव गाडगीळ यांचे कार्य सुरू ठेवणे ही काळाची गरज
श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केले मत
सातारा
ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ आणि संशोधक माधव गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण संवर्धनासाठी जे काम केले आहे ते भविष्यात तसेच सुरू ठेवणे हीच त्यांना दिलेली सर्वात मोठी श्रद्धांजली असेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर रानवाटाचे पुरुषोत्तम पाटील,आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे डॉक्टर संदीप श्रोत्री आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस उपस्थित होते
दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या श्रद्धांजली सभेचे प्रस्ताविक दैनिक प्रभातचे निवासी संपादक कात्रे यांनी केले त्यांनी माधव गाडगीळ यांच्या पर्यावरण विषयक कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. पुरुषोत्तम पाटील यांनी रानवाटातर्फे माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली. धनंजय कुलकर्णी यांनीही माधव गाडगीळ यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. माधव गाडगीळ यांनी जे कार्य आयुष्यभर केले ते यापुढेही चालू ठेवण्याच्या गरजेवर भर दिला.
रमण वेलणकर यांनी माधव गाडगीळ यांच्या साताऱ्यातील वास्तव्याबाबत आठवणी उलगडल्या.गाडगीळ कुटुंबाची माहिती त्यांनी दिली.
श्रीराम नानल यांनी माधव गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सांगितले.
प्राचार्य राजेंद्र शेजवळ यांनी गेल्या शतकात माधव गाडगीळ यांनी केलेल्या संशोधन कार्याचा पर्यावरण क्षेत्राला कसा लाभ झाला याची माहिती दिली. माधव गाडगीळ यांच्या ज्ञानाचा संपूर्ण फायदा देशाला होऊ शकला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मुकुंद फडके यांनी माधव गाडगीळ यांनी केलेल्या पर्यावरणाच्या व्याख्येचा उल्लेख केला. पर्यावरण म्हणजे निसर्गाने भविष्याशी केलेला करार असतो, या एका सूत्रावर आधारित माधव गाडगीळ यांनी आपले सर्व संशोधन केले असे त्यांनी स्पष्ट केले.भविष्याचा विचार करून वर्तमानात विकास प्रक्रिया पूर्ण करावी लागते हा माधव गाडगीळ यांचा विचार आजही महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगितले
शिरिष चिटणीस यांनी माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहताना या थोर व्यक्तीचे स्मरण व्हावे म्हणून वर्षभर विविध कार्यक्रम केले जावेत अशी सूचना केली.दीपलक्ष्मीचे सभागृह त्यासाठी उपलब्ध असेल असेही त्यांनी सांगितले. श्रीनिवास वारुंजीकर यांनीही माधव गाडगीळ यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी आपल्या भाषणामध्ये माधव गाडगीळ यांच्या सहवासाच्या काही आठवणी सांगितल्या. साधी राहणी असलेल्या माधव गाडगीळ यांनी आयुष्यभर पर्यावरण संवर्धनाचा ध्यास जोपासला .सातारा त्यांचे आजोळ असल्यामुळे सतत त्यांचे सातारला येणे होत असे. सातारच्या समृद्ध जैवविविधतेचा त्यांना अभिमान होता असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉक्टर स्वाती श्रोत्री,श्रीकांत वारुंजीकर, प्रशांत तरडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

