निरंजन टकले यांचे मंगळवारी साताऱ्यात व्याख्यान
सातारा
सातारा येथे होणाऱ्या नियोजित १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या निमित्ताने ” घालमोड्या दादांचे संमेलन व आमची भूमिका ” या विषयावर जेष्ठ पत्रकार व विचारवंत निरंजन टकले ( नाशिक) यांचे व्याख्यान मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सातारा येथे होणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र व शिव, फुले, शाहू,आंबेडकरी संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी चौदाव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर आहेत, अशी माहीती प्रसिद्धी पत्रकाद्वारे विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने देण्यात आली आहे.
महात्मा फुले यांना तत्कालीन ग्रंथकर सभेने त्यांच्या साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु महात्मा फुले यांनी हे निमंत्रण नाकारून, या घालमोड्या दादांच्या संमेलनास मी उपस्थित राहणार नाही अशी भूमिका घेवून तत्कालीन प्रस्थापित साहित्यिक क्षेत्राच्या विरोधात विद्रोह केला होता. विद्रोहीने महात्मा फुले यांचं हेच पत्र आधार मानत आतापर्यंत १४ साहित्य संस्कृती संमेलनांचे यशस्वी आयोजन केले आहे.
व्याख्यानाला पद्मश्री लक्ष्मण माने , प्रा डॉ. बाबुराव गुरव, एडवोकेट सुभाष (बापू) पाटील, ह.भ.प.डॉ. सुहास फडतरे महाराज, एडवोकेट वर्षा देशपांडे , कॉ. धनाजी गुरव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा व्याख्यान कार्यक्रम दैवज्ञ सांस्कृतिक भवन, यादव गोपाळ पेठ, सातारा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे निमंत्रक कॉ. विजय मांडके, मिनाज सय्यद, आयु. गणेश भिसे, ॲड. राजेंद्र गलांडे, ॲड. दयानंद माने, प्राचार्य डॉ. अरुण गाडे , डॉ. प्रशांत पन्हाळकर व नारायण जावलीकर यांनी केले आहे.

