वाचाल तर वाचाल:श्रीराम नानल
जनवाचक चळवळीतर्फे पुस्तके प्रदान कार्यक्रम
सातारा
वाचाल तर वाचाल हे विधान खरे असल्याने विशेषता तरुण पिढीने वाचनाची कास धरावी व नवनवीन पुस्तकाचे वाचन करून मन समृद्ध करावे असे उद्गार जनवाचक चळवळीचे मुख्य समन्वयक श्रीराम नानल यांनी काढले. परळी नजीकच्या यादव वाडी, बनघर आणि खडगाव ग्रामपंचायतींना जनवाचक चळवळीतर्फे पुस्तके प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते.
नानल म्हणाले,पुस्तक वाचनाने आपले ज्ञान वाढते तसेच आत्मविश्वास वाढतो जनवाचक चळवळीसाठी मुंबई पुण्याहून खूप लोक पुस्तक पाठवत आहेत ही आशादायक गोष्ट आहे
परळी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलचे नारायणराव पंडिततिन्ही गावांमध्ये उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचा फायदा घेण्याची ग्रामस्थांना विनंती केली. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचे आश्वासन त्यांनी नानल यांना दिले.
यादववाडीच्या सरपंच सौ हेमलता सुतार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने ही वाचन चळवळ वाढविण्याचे आश्वासन दिले. यादव वाडी येथील शिक्षक हेमंत तुकाराम इंगळे हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. यादववाडी ग्रामपंचायतचे सदस्य संजय दत्तात्रय लोहार तसेच ग्रामस्थ श्याम दगडू देवरे, विकास अंकुश पवार, विश्वास प्रकाश वाघ, भिकू सिताराम यादव आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
बनघर येथील कार्यक्रम हनुमान मंदिरात झाला. त्यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य किसन मारुती किर्दत आणि रमेश गंगाराम गुजर व हनुमंत राणू गुजर हेही उपस्थित होते. बनघरचे सरपंच विशाल राजेंद्र गुजर यांनी ही चळवळ बनघरमध्ये वाढवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
खडगाव येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ मनीषा विजय शिरिटावले होत्या. वाचनाने विद्यार्थ्यांच्या निरीक्षणात वाढ होईल तसेच ज्ञानातही वाढ होईल असे सांगून त्यांनी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. गावात वाचनालय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांनी केली. यावेळी उपसरपंच सौ पुष्पा रविंद्र शिरटावले, विजय रामचंद्र शिरिटावले तसेच उपशिक्षक केशव गणपती अलट उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात ही चळवळ खडगाव गावात जोमाने वाढवण्याचा निश्चय व्यक्त केला. या तिन्ही ग्रामपंचायत मध्ये प्रारंभी क वर्ग वाचनालय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन श्रीराम नानल व नारायण पंडित यांनी दिले. त्यासाठी हेमंत इंगळे तसेच केशव अलटही मदत करणार आहेत.
फोटो ओळ १
पुस्तक प्रदान कार्यक्रमात सर्व ग्रामस्थ, श्रीराम नानल, हेमलता सुतार, नारायण पंडित व हेमंत इंगळे
फोटो ओळ २ पुस्तक प्रदान कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ, सौ मनीषा शिरटावले, श्रीराम नानल, नारायण पंडित व केशव अलट.