बालवयातच ध्येय निश्चित करा: कु. तेजस्विनी चव्हाण


लोकमंगल हायस्कूल बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात

सातारा
“बालवय हे संस्कारांचे, कल्पनाशक्तीचे आणि व्यक्तिमत्त्व घडण्याचे वय असते. सध्या मुलांकडून पुस्तकवाचनाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळेच बालकुमार साहित्य संमेलनासारख्या उपक्रमांची गरज अधिक आहे. शालेय जीवनात जे शिकायला मिळते, ते आत्तापासूनच आत्मसात केले पाहिजे. आपले ध्येय लवकर ठरवून अभ्यासासोबत कला, छंद जोपासले पाहिजेत. भविष्यात व्यवसाय करताना आई-वडिलांच्या जीवावर न राहता स्वतःच्या कष्टावर उभे राहिले पाहिजे,” असे आवाहन १९ व्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कु. तेजस्विनी चव्हाण (बी. फार्म) यांनी केले.
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे शाखा सातारा, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा व लोकमंगल हायस्कूल, मोळाचा ओढा, गेंडामाळ, शाहूपुरी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार लोकमंगल हायस्कूल, सातारा येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकमंगल हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी कु. तेजस्विनी चव्हाण यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी विद्यार्थी व सर्पमित्र मयूर आडागळे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा अध्यक्ष शिरीष चिटणीस, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा अध्यक्ष शिल्पा चिटणीस, माजी सैनिक रामचंद्र जाधव तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैला साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विनीत म्हणून अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा सहकार्यवाह नंदा पवार, लोकमंगल हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय सावंत व वरिष्ठ शिक्षक शांताराम पवार यांनी काम पाहिले. सकाळी उद्घाटन, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, स्वागतगीत, प्रास्ताविक व मान्यवरांची मनोगते झाली. दुपारी कथाकथन, काव्यगायन, ‘मला आवडलेले पुस्तक’ तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संमेलन रंगले.

Advertisement

माजी विद्यार्थी मयूर आडागळे यांनी शालेय जीवनातील अनुभव सांगताना वक्तृत्व, रांगोळी, स्वागतगीत तसेच राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धांमधील सहभागामुळे व्यक्तिमत्त्व विकास झाला, असे नमूद केले. माजी विद्यार्थ्यांना व्यासपीठ देणारी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था ही एकमेव संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. गेली दहा वर्षे सर्पमित्र म्हणून कार्यरत असून पर्यावरणाच्या दृष्टीने वनवे विझवण्याचे कामही आपली टीम करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिरीष चिटणीस यांनी माजी विद्यार्थ्यांचे अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात, म्हणूनच त्यांना कार्यक्रमात आमंत्रित केले जाते, असे सांगितले. आई-वडील व शिक्षक आपल्या पाल्यांसाठी घेत असलेल्या कष्टांची जाणीव विद्यार्थ्यांना असली पाहिजे. ठाम निश्चयाने एखादे कार्य हाती घेतल्यास कोणत्याही परिस्थितीतून यश मिळवता येते, असे त्यांनी नमूद केले.

शिल्पा चिटणीस यांनी ‘बाल’ म्हणजे छोटी व ‘कुमार’ म्हणजे मोठी मुले, अशा दोन्ही वयोगटांसाठी हे संमेलन असून येथे विद्यार्थ्यांच्या कला, छंद व सुप्त गुणांचे प्रकटीकरण होते. योग्य वयात कलागुण ओळखून बालकुमार साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिले जाते, असे सांगितले.

रामचंद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांनी सामूहिक कार्यक्रमांत सहभाग घ्यावा, स्पर्धेच्या युगात वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करावा आणि कोणत्याही अडचणींवर मात करून पुढे जावे, असा सल्ला दिला. शालेय जीवनात मिळणारे संस्कार आयुष्याला दिशा देतात, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात राज्यगीत व स्वागतगीत रमेश महामुलकर व दत्तात्रय सावंत यांनी तबला-पेटीच्या तालावर सादर केले. दत्तात्रय सावंत यांनी इंद्रजीत भालेराव यांची ‘माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता’ ही कविता सादर केली. विद्यार्थ्यांनी विविध कविता, गीत व नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘मी वाचलेले पुस्तक’ या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

या संमेलनास जितेंद्र टोणपे, विपुल लोहार, बाळकृष्ण इंगळे, अनिल सुर्वे, उज्वला कर्णवर, शेग्या गावित, हणमंत खुडे, दत्तात्रय शिर्के, जगदीश खंडागळे, संदीप भोसले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिल्पा चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन शांताराम पवार यांनी केले तर आभार दत्तात्रय सावंत यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!